



अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत विविध पक्षातील नवनवीन चेहरे मैदानात उतरणार असून विरोधकांना धूळ चारण्यासाठी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उभे करू. विधानसभा निवडणूकीसाठी कार्यकर्त्यांनी देखील सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केले.
आल्लापल्ली येथील क्रीडा संकुलच्या भव्य पटांगणामध्ये रविवारी, (दि. 29) काँग्रेस पक्षातर्फे आयोजित भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार नामदेव किरसान, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, माजी आमदार पेंटा तलांडी, अजय कंकडलवार, हनमंतू मडावी, सगुणा तलांडी, पप्पु हकीम, बबलू सडमेक, अशोक आईंचवार, बानाय्या जनगाम, सोनाली कंकडालवार, रोजा करपेत, सुरेखा आलाम, सुनीता कुसनाके, कार्तिक तोगम, राकेश दुर्गे, प्रज्वल नागूलवार आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना ना. विजय वडेट्टीवार म्हणाले, येत्या काही दिवसांत विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रासाठी एकच खुर्ची आहे. मात्र त्या खुर्चीसाठी प्रयत्न करणारे अनेकजण आहेत. आता प्रत्येकाला खुर्चीची ओढ लागली आहे. निवडणूक आली की सर्वजण बाहेर पडत आहेत. यंदा काही नवीन चेहरे देखील मैदानात उतरणार आहेत. लोकशाही असल्याने प्रत्येकाला संधी आहे. विरोधक बरेच ठिकाणी टीका करताना दिसत आहेत. काही लोकांनी तर आपली पातळी सोडली आहे. चाळीस वर्ष राजे घराणेशाही सत्तेवर आहे. पण विकास मात्र काहीच नाही. ग्रामीण भागात आजही रस्ते नाहीत, वीज नाही. आता आपल्याला सामान्य जनतेतून नेता निवडून द्यायचा आहे. या विधानसभा क्षेत्रात आपली घराणेशाही खुर्ची टिकवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा सूचक इशारा त्यांनी दिला.
लोकसभा निवडणूकीत जनतेने कॉंग्रेसवर विश्वास दाखविला. विधानसभेतही हाच विश्वास कायम ठेवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. या भागातील जनतेच्या समस्या सोडवणूकीस कुणालाच वेळे नाही, आजही खाटेवर रुग्णांना न्यावे लागते, ही शोकांतिक आहे. राज्यातील मंत्री येऊन लाडकी बहीण योजना आम्ही आणली हे सांगतात 1500 रुपये दिलं आपल्या खात्यात आले का? असा रॅम्प वॉक करून लाडकी बहीनीला सांगतात. पण 1500 रुपये दिलं पण तिकडे तेलाचे भाव 35 रुपयांनी महागले हे का सांगत नाहीत, असा टोलाही त्यांनी मारला.
काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात उसळलेली जनसागर
यावेळी माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार, खासदार नामदेव किरसान, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनीही कार्यकर्त्यांना संबोधित केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. संचालन प्रज्वल नागुलवार यांनी केले. मेळाव्याला तालुक्यातील सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.