पुत्रीच्या विरहात पित्याचीही आत्महत्या -प्रेमीयुगल आत्महत्या प्रकरण; 24 तासात तिघांनी संपविला जीवनयात्रा

494

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क – (मुलचेरा प्रतिनिधी) प्रेमीयुगलाने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथे उघडकीस आली होती. या घटनेचा पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना केले होते. अशातच आत्महत्या करणा-या मुलीच्या विरहात पित्यानेही गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. अमित अनिल रॉय (40) रा. विजयनगर असे मृतक पित्याचे नाव आहे.


सविस्तर वृत्त असे की मुलचेरा तालुक्यातील लक्ष्मीपूर येथील जयदेव मिलन मंडल (20) व विजयनगर येथील अमेला अमित रॉय (18) या प्रेमीयुगल 5 ऑक्टोबर रोजी घरातून गायब झाले होते. दरम्यान रात्रोच्या सुमारासच त्यांनी लक्ष्मीपूर येथील शेतक-याच्या शेतातील झोपडीत गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस येतातच लक्ष्मीपूर गावात एकच खळबळ निर्माण झाली होती. मुलचेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठित दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले होते. अशातच मुलीने आत्महत्या केल्याची माहिती प्राप्त होताच पिता अमित अनिल रॉयही घरातून गायब झाले होते. मुलचेरा पोलिसांद्वारे त्यांचाही शोध घेतला जाता असतांना मोबाईल ट्रॅकिंगवरुन त्यांचे लोकेशन सापडले. याअंतर्गत पोलिसांनी शोधमोहिम राबविली असता रविवारी रात्रीच्या सुमारास विजयनगर गावालगतच्या जंगलात झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.
जयदेव मंडल व अमेला रॉय या प्रेमीयुगलांनी तरुण वयात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर काही तासाच्या अवधीतच मुलीच्या चित्याला अग्नी न देताच मुलीच्या विरहात बापानेही आपली जीवनयात्रा संपविली. दोन कुटूंबातील तिघांचा जीव गेल्याने दोन्ही कुटूंबावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here