गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभेने मारली टक्केवारीत बाजी! -पुरुषांसह महिला मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद -नवमतदारांमध्ये दिसून आला उत्साह

298

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी (
विधानसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यातील गडचिरोली, आरमोरी, अहेरी तिन्ही विधानसभा मतदार संघातील मतदारांनी लोकशाही पर्वात सहभागी होत 20 नोव्हेंबरला मतदान केले. यापैकी आरमोरी मतदार संघाने टक्केवारीत बाजी मारल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरुन स्पष्ट होत आहे. पुरुषांसह महिलांनीही घराबाहेर पडत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानेच आरमोरी मतदार संघात सर्वाधिक 74.50 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे या विधानसभा क्षेत्रात येत असलेल्या पाच तालुक्यातील नवमतदारांनी पहिल्यांदाच मतदान करीत लोकशाहीच्या या पर्वात हिरहिरीने सहभाग नोंदिवला.
आरमोरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरचीसह धानोरा तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राकरिता 310 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. तसेच पयायी व्यवस्था म्ळणून 36 मतदान पथके राखीव ठेवण्यात आली होती. या भागातील मतदारांनी सकाळी 7 वाजेपासूनच केंद्रावर रांगा लावण्यास सुरुवात केली होती. सकाळी 9 वाजता 13.53 टक्के एवढी मतदानाची नोंद करण्यात आली. 11 वाजेनंतर मात्र मतदारांची केंद्रावर प्रचंड गर्दी उसळण्यास सुरुवात झाली. परिणामी सकाळी 11 पर्यंत झालेल्या 30.75 मतदान टक्केवारीने दुपारी 3 वाजेपर्यंत थेट 60.50 टक्क्यावर झेप घेतली. सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार 71.26 टक्के मतदान पार पडले. या भागातील अनेक पथके नक्षलप्रभावित क्षेत्रात असल्याने या केंद्रावर मतदानाची आकडेवारी गोळा करण्यासाठी रात्री बराच उशीर झाला. अखेर जिल्हा निवडणूक आयोगाने दिलेल्या अतिंम माहितीनुसार गडचिरोली व अहेरी मतदार संघाच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजेच 74.50 टक्के एवढी मतदानाची टक्केवारी घोषित करण्यात आली.

ईव्हीएमच्या संथगतीमुळे मतदारांना मनस्ताप –कोरची व कुरखेडा या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागातील अनेक केंद्रावर संथगतीने मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. केंद्रावर मतदारांनी मोठी गर्दी केली असतांना केंद्रावरील मतदान प्रक्रिया लांबल्याने मतदारांना नाहक त्रास सहन करावा लागला. परिणामी या ठिकाणी 5 वाजेपर्यंत मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

विधानसभा निहाय मतदानाची अंतिम टक्केवारी-
अहेरी-69 73.26 टक्के
आरमोरी-67 74.50 टक्के
गडचिरोली-68 73.32 टक्के

ज्येष्ठ नागरिकांनी काठी हाती घेत गाठले केंद्र –आरमोरी विधानसभा मतदार संघात एकूण 2 लाख 62 हजार 700 च्यावर मतदारांची नोंद आहे. यामध्ये 1 लाख 31 हजार 60 पुरुष तर 1 लाख 31 हजार 710 महिला मतदारांचा समावेश होता. तर 1985 दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. पुरुष, महिलांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवित असतांना दिव्यांगी मागे नसल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर एकीकडे नवमतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी केंद्र गाठत असतांना ज्येष्ठ नागरीक हाती काठी घेत वा व्हीलचेअरवर कुटूंबियांच्या मदतीने केंद्र गाठित मतदानाचा हक्क बजाविला.

नक्षलप्रभावित क्षेत्रात चोख बंदोबस्त –
आरमोरी विधानसभा क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या कोरची व कुरखेडा तालुक्यातील काही भाग छत्तीसगड सीमेलगत असून हा परिसर नक्षल प्रभावित असल्याने या परिसरातील केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. संवेदनशील बुथवर दोन दिवसांपूर्वी मतदान पथके रवाना करण्यात आली होती. या अतिसंवेदनशील भागातील आदिवासी मतदारांनीही सकाळीच केंद्रावर उपस्थित होत मतदान केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here