


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
धानोरा (प्रतिनिधी)
येथील पोलिस ठाण्यातील केंद्रीय राखीव दलाच्या 113 बटालियनच्या एका जवानाने कर्तव्यावर असतांनाच रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी, (दि.24) सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली. गिरीराज रामनरेश किशोर (30) रा. आग्रा, उत्तरप्रदेश असे मृत सीआरपीएफ जवानाचे नाव आहे. या घटनेने धानोरा पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
सविस्तर वृत्त असे की येथील पोलिस ठाण्यात जिल्हा पोलिसांसह केंद्रीय राखीव दल 113 बटालियनचे जवान कार्यरत आहेत. गिरिराज किशोर हा सीआरपीएफ जवान ऑक्टोबर 2024 मध्ये येथील बटालियनमध्ये रुजू झाला होता. नेहमीप्रमाणे आज सकाळच्या सुमारास कर्तव्य बजावित असतांना त्याने स्वत:कडील रायफलमधून डोक्यात गोळी झाडून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. घटनेनंतर पोलिसांन त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याने आत्महत्या का केली हे वृत्त लिहिस्तोवर कळू शकले नसून पुढील धानोरा पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे धानोरा पोलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली.
जवानांच्या मानसिक तणावाचा प्रश्न गंभीर-
मागील वर्षी 12 फेब्रुवारी 2024 ला गडचिरोली येथील जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानी तैनात राज्य राखीव दलाच्या जवानाने गोळी झाडून जीवन संपविल्याची घटना घडली होती. त्यानंतर 11 डिसेंबरला जिल्हा सत्र न्यायाधीशाच्या सुरक्षा रक्षकाने न्यायालय परिसरातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. जवानांच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे कुटूंबापासून दुर राहून सेवा बजाविणा-या जवानांच्या मानसिक तणावाचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.