दक्षिण गडचिरोली विभागीय समितीच्या जहाल नक्षली दाम्पत्यासह चौघांना अटक -106 गंभीर गुन्ह्यासह,दिरंगी-फुलनार चकमकीतील जवानाच्या हत्येत सक्रिय सहभाग

363

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी)
भामरागड तालुक्यातील कोठी पोलिस ठाणे हद्दीअंतर्गत येत असलेल्या दिरंगी-फुलनार जंगल परिसरात 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत एक पोलिस जवान शहीद झाला होता. या चकमकीत सक्रीय सहभागी असलेल्या चार जहाल नक्षल्यांना अटक करण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे यात वरिष्ठ माओवादी दाम्पत्य रघु आणि जैनी यांचेसह भामरागड दलमच्या दोन महिला सदस्यांचा समावेश आहे. मागील काही कालावधीत जहाल नेत्यांना अटक तसेच सदस्यांचे आत्मसमर्पण कायम असतांना पुन्हा वरिष्ठ माओवाद्यांसह दोन सदस्यांच्या अटकेमुळे नक्षल चळवळीला खिंडार पडली आहे.
दक्षिण गडचिरोली विभागीय समितीच्या सचिव सायलु भुमय्या मुड्डेला ऊर्फ रघु ऊर्फ प्रताप ऊर्फ इरपा (55) रा. लिंगापूर, ता. दरपेल्ली, जि. निजामाबाद (तेलंगाणा) व भामरागड दलमची डीव्हीसीएम तसेच भामरागड एरिया कमिटी सचिव जैनी भिमा खराटम ऊर्फ अखीला ऊर्फ रामे (41)रा. कंचाला, ता. भोपालपट्टानम, जि. बीजापूर (छत्तीसगड) दोघेही दाम्पत्य व भामरागड दलम सदस्य असलेले झाशी दोघे तलांडी ऊर्फ गंगु (30) रा. येचली, ता. भामरागड, मनिला पिडो गावडे ऊर्फ सरिता (21) रा. कापेवंचा ता. अहेरी अशी अटकेतील नक्षल्यांची नावे आहेत. या चारही नक्षलींवर राज्य शासनाने 40 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते, हे विशेष.
उपविभागीय भामरागड अंतर्गत येत असलेल्या पोलिस ठाणे ताडगाव येथील पोलिस पथक व सीआरपीएफ 9 बटालियन कंपनीचे जवान संयुक्तरित्या शनिवारी, (दि.19) पल्ली जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना चार संशयित व्यक्ती फिरत असताना आढळून आल्याने पथकाच्या जवानांनी त्यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशीसाठी त्यांना पोलीस उप-मुख्यालय प्राणहिता येथे आणले असता दिरंगी-फुलनार जंगलात झालेल्या चकमकीसह विविध गुन्ह्यात सहभागी असलेले जहाल नक्षली असल्याचे स्पष्ट झाले. घातपाताच्या दृष्टीने रेकी करण्यासाठी जंगलात फिरत असल्याचे उघड झाले. याअंतर्गत त्यांचेवर कोठी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे नोंदवित अटक करण्यात आली.
सदर कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमांडंट 09 बटा. सिआरपीएफ, शंभू कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी सत्य साई कार्तिक, पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे ताडगाव व सिआरपीएफच्या अधिकारी व जवान यांनी पार पाडली.

माओवादी दाम्पत्यावर 106 गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेल्या जहाल माओवादी नेते असलेल्या रघु आणि जैनी या दाम्पत्यावर तब्बल 106 गुन्हे दाखल होते. यामध्ये रघूचा 34 चकमक, 7 जाळपोळ, 23 खुन व 13 इतर अशा एकूण 77 गुन्ह्यात समावेश आहे. त्याचेवर शासनाने 20 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. तर पत्नी जैनी जिल्ह्यावर 18 चकमक, 3 जाळपोळ, 4 खून व इतर 4 असे एकूण 29 गुन्हे दाखल आहे. राज्य शासनाने तिचेवर 16 लाख रुपयाचे बक्षिस जाहीर केले होते.

दलम महिला सदस्यांवर प्रत्येकी 2 लाखांचे बक्षिस
भामराड दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत असलेल्या झाशी तलांडी व मनिला गावडे यांचेवर राज्य शासनाने प्रत्येकी 2 लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. यात झाशी हिच्यावर 12 चकमक, 1 खुन व इतर 1 अशी 14 गुन्हे दाखल आहेत. तर मनिला हिचेवर 4 चकमक, 5 खून, इतर 1 अशी 10 गुन्हे दाखल आहेत.

आतापर्यंत 96 माओवाद्यांना अटक
जिल्हा पोलिस नक्षल चळवळीशी दोन हात करीत असतांना अनेक जहान माओवादी नेत्यांसह सदस्यांना अटक करण्यात आले आहे. दिरंगी-फुलनार जंगल परिसरात 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीदरम्यान शहीद झालेल्या पोलिस जवानाच्या हत्येप्रकरणी आज चार माओवाद्यांना अटक करण्यात आली. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकुण 96 माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here