


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
धानोरा (प्रतिनिधी)
समोरुन येणा-या रुग्णवाहिकेला साईड देताना दुचाकी स्लीप होवून रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, 6 मे रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास धानोरा येथील स्टेट बॅंकेसमोर घडली.
भगचंद माणिक लीलारे (28) रा. पठारी जि. बालाघाट (छत्तीसगड) असे मृतकाचे नाव आहे. भागचंद हा एमएच 49 बीवाय 3106 क्रमांकाच्या दुचाकीने आपल्या घरी जात होता. तर मुरूम गावकडून एक रुग्णवाहिका गडचिरोलीकडे जात होती. या रुग्णवाहिकेला साईड देताना त्याची दुचाकी दगडावरून गेल्याने स्लिप झाली. त्यामुळे तो रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. त्याला ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अधिक तपास धानोरा पोलिस करीत आहेत.