घातपाताचा मोठा डाव जिल्हा पोलिसांनी उधळवून लावले -पाच जहाल महिला नक्षल्यांना अटक -बिनागुंडा जंगलातील कारवाई

455

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
पाच जहाल महिला नक्षल्यांना अटक
बिनागुंडा जंगलातील कारवाई

गडचिरोली (प्रतिनिधी)
विध्वंसक कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या अनेक हिंसक कारवायात सहभागी असलेल्या पाच जहाल नक्षली महिलांना ताब्यात घेत नक्षल्यांचा घातपाताचा मोठा डाव जिल्हा पोलिसांनी उधळवून लावला आहे. सदर कारवाई मंगळवारी, (दि.20) भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील बिनागुंडा येथे पार पाडण्यात आली. यातील तिघींना अटक करण्यात आली असून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या पाचही नक्षलींवर 36 लाखाचे बक्षिस होते.
उंगी मंगरु होयाम उर्फ सुमली (28) रा. पल्ली, ता. भैमरगड जि. बिजापूर, पल्लवी केसा मिडियम उर्फ बंडी (19) रा. कोचल ता. आवापल्ली जि. बिजापूर, देवे कोसा पोडियाम उर्फ सविता (19) रा. मारोट ता. आवापल्ली जि. बिजापूर सर्व (छत्तीसगड राज्य) अशी अटकेतील नक्षलींची नावे आहे. इतर दोन नक्षली अल्पवयीन असून त्यांच्याबद्दल ठोस पुरावा नसल्याने त्यांना बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येणार आहे. या दोघांचा पोलिस अभिलेखात दाखल गुन्ह्यात सहभाग आहे काय, याची पडताळणी सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिस विभागाने दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड राज्य सीमेलगत असलेल्या बिनागुंडा येथे 50 ते 60 नक्षली एकत्र येऊन पोलिसांचा घातपात करण्याचा कट रचत असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, एम. रमेश व सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनात व पोलिस उपअधीक्षक विशाल नागरगोजे यांच्या नेतृत्वात सी-60 दलाचे 6 पथके तसेच केंद्रीय राखीव दलाच्या 37 क्रमांक बटालियनच्या जवानांना 18 मे रोजी बिनागुंडा परिसरात रवाना करण्यात आले होते. सोमवारी, (दि.19) जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना काही संशयित नागरिक आढळून आले. यातील काही जण हिरवे-काळे गणवेश परिधान केलेले, तर काही साध्या वेशभूषेतील होते. त्यांच्याकडे बंदुकादेखील होत्या. यातील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, इतर जण जंगलात पसार झाले.
सदर कारवाई नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, उपमहानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल, सिआरपीएफ कमांडंट दाओ इंजिरकान कींडो यांच्या मार्गदर्शनात पार पडली.

2022 पासून 103 नक्षल्यांना अटक
जिल्हा पोलिस दलाने जानेवारी 2022 पासून आतापर्यंत 103 नक्षल्यांना अटक केली आहे. तर अनेक जहाल माओवाद्यांसह सदस्यांनी शस्त्रे खाली टाकित आत्समर्पण केले आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर जंगल परिसरात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे निर्देश दिले असून माओवाद्यानी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

डीव्हीसीएम उंगीवर 16 लाखाचे बक्षीस
प्लाटून क्रं. 32 ची विभागीय समिती सदस्य असलेल्या उंगी होयाम हिचेवर महाराष्ट्र शासनाने 16 लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. तर याच प्लाटूनची एसीएम असलेल्या पल्लवी मिडियम हिचेवर 8 लाखांचे बक्षीस होते. देवे पोडियाम ही याच प्लाटूनची सदस्य असून तिच्यावर 4 लाख रुपयांचे तर अन्य दोन नक्षलींवर एकूण 8 लाख रुपयांचे बक्षीस होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here