



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
आष्टी (प्रतिनिधी)
चारचाकी वाहनाने बोगस बिटी बियाणांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच कृषी विभाग व आष्टी पोलिसांनी सापळा रचून एकूण 3 लाख 80 हजार रुपये किंमतीचे बोगस बिटी बियाणे जप्त केल्याची कारवाई 21 मे रोजी दुपारी 4 ते 7 वाजतादरम्यान आष्टी ते चामोर्शी मार्गावर केली. या प्रकरणी वाहन चालक विनोद श्रीहरी वाढई (42) रा. बेंबाळ, ता. मुल जि. चंद्रपूर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आष्टी येथून चारचाकी वाहनाद्वारे बोगस बिटी बियाणांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळताच, आष्टी पोलिस व कृषी विभागाच्या पथकाने आष्टी ते चामोर्शीकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला. दरम्यान, एमएच 34 बीझेड 4958 क्रमांकाचे संशयीत चारचाकी वाहन येताच दिसताच वाहनास थांबवून तपासणी केली असता, त्यात 1 लाख 80 हजार रुपये किंमतीचे पुष्पा 5जी संशोधित हायब्रिड कपास बियाणे असा आशय लिहून असलेली 4 पोत्यांमध्ये 200 पाकिटे तसेच 2 लाख रुपये किंमतीचे 4 पोत्यामध्ये 100 किलोग्रॅम बिज प्रक्रिया केलेले बियाणे आढळून आले. पथकाने 3 लाख 80 हजाराचे बोगस बियाणे व 7 लाख रुपये किंमतीचे चारचाकी पिकअप वाहन जप्त केले. तालुका कृषी अधिकारी अमित फुलचंद तुमडाम यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक विनोद वाढई याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोहवा विलास सेडमाके व पथकाने केली. अधिक तपास पोनि विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.