सावली जवळ झालेल्या अपघातात आष्टीतील पती ठार; पत्नी गंभीर – अवघ्या सात महिन्याच्या सुखी संसारावर काळाचा घाला

295

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी)
चंद्रपूर येथून महाकाली मातेचे दर्शन घेऊन पत्नीसह दुचाकीचे परत येत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील सावली जवळ विरुद्ध दिशेने येणा-या अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात जिल्ह्यातील पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी, 9.30 वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद देवराव जयपूरकर रा. आष्टी ता. चामोर्शी असे ठार झालेल्या पतीचे तर प्रणाली प्रमोद जयपूरकर (23) असे गंभीर जखमी पत्नीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार आष्टी येथील प्रमोद जयपूरकर हा गडचिरोली येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागात कंत्राटी आर्किटेक्टर म्हणून कार्यरत होता. तो आपल्या पत्नीसह चंद्रपूर येथे महाकाली मंदिरात आयोजीत कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेला होता. कार्यक्रम आटोपून दुचाकी क्र. एम. एच. 33 यु. 3608 ने तो पत्नीसह गडचिरोलीकडे येत असताना सावलीलगत त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यात प्रमोद जयपूरकर जागीच ठार झाला. तर पत्नी प्रणाली हिच्या पायाला जबर मार लागल्याने तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे प्रमोद याचा मार्च महिन्यात तेलंगणा राज्यातील प्रणाली हिचेशी विवाह पार पडला होता. विवाहाला केवळ सात महिने पार पडले असतांना दोघेही सुखी संसाराची स्वप्ने रंगवित असतांनाच प्रमोदचा अपघातात मृत्यू झाल्याने प्रणालीचे सुखी संसाराचे स्वप्न धुळीस मिळाले असून प्रमोदच्या जाण्याने जयपूरकर कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here