दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील बहूसंख्य ग्रापंवर कॉंग्रेस, राकॉंचा झेंडा

312

 

विजयी उमेदवारांची कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
गडचिरोली(प्रतिनिधी )
जिल्ह्यात 111 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रीक तथा पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील बहूतांश ग्रापंचायती बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात जिल्ह्यात 24 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. रविवारी मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर आज, मंगळवारी प्रत्यक्ष निकाल घोषित करण्यात आला. निकाल जाहीर होताच ग्रामपंचायतीवर वर्चस्वासाठी प्रमुख राजकीय पक्षाद्वारे दावे-प्रतिदावे करण्यात आले. एकीकडे राजकीय पक्षांचे हेवेदावे सुरु असतांना दुसरीकडे मात्र विजयी उमेदवारांनी दिवाळीपूर्वीच विजयाचा फटाके फोडित जल्लोष केला.
जिल्ह्यातील 24 ग्रामपंचायतीवर थेट सरपंच तसेच निवडणूकीअंतर्गत ग्रापं सदस्यांची प्रत्यक्ष निवडणूक प्रकिया पार पडली. यात कोरची तालुक्यातील 7, धानोरा तालुक्यातील 5, अहेरी 2, एटापल्ली 3, भामरागड 6 तर सिरोंचा तालुक्यातील एकमेव कोटापल्ली ग्रापंसाठी निवडणूक पार पडली. रविवारी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद केले होते. राज्यभरात सोमवारी ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला असला तरी गडचिरोली जिल्ह्यात मात्र आज, मंगळवार मतमोजणीचा कार्यक्रम पार पडला. निकाल जाहीर होताच मुख्य राजकीय पक्षांनी सर्वाधिक जागेवर सरपंच पदासह ग्रापंवर कब्जा केल्याचे दावे केले. एकीकडे राजकीय पक्षीय नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरु असतांना दुसरीकडे मात्र विजयी उमेदवारांनी दिवाळपूर्वीच फटाक्यांचा बार उडवित विजयी जल्लोष केला. तर पराजीत झालेल्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा नव्या उमेदीने निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार केला.

अहेरी उपविभागात राकॉंचे सर्वाधिक उमेदवार विजयी
अहेरी उपविभागातील अहेरी, भामरागड, सिरोंचा तसेच एटापल्ली तालुक्यातील ग्रामपंचायतीवर राकॉं (अजित पवार गट)चे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले होण्यासोबतच अनेक ग्रापंवर राकॉंचे सरपंच निवडून आल्याने राकॉंने संबंधित ग्रापंवर झेंडा रोवला आहे. एटापल्ली तालुक्यातील नागूलवाही, हालेवारा, जांभिया ग्रापं राकॉंचे सरपंच उमेदवार विजयी झाले आहेत. भामरागड तालुक्यातील 3 ग्रापंसह अहेरी तालुक्यातील एका ग्रापंवर राकॉं समर्थिक उमेदवार विजय मिळविला आहे. तर भामरागड तालुक्यातील एका ग्रापंवर भाजपा तर दोन ग्रापंवर आविसंचे उमेदवार विजयी झाले आहे. सिरोंचा तालुक्यातील एकमेव ग्रापंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा सरपंच निवडून आला असून भाजपाचे 4, राकॉं 2 व अन्य एक उमेदवार ग्रापं सदस्य विजयी झाले आहे. तर अहेरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीवर आविसंने कब्जा केला आहे.
विजयी उमेदवारांची कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
आज मंगळवारी ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी फटाके फोडित, गुलाल उधळित एकच जल्लोष केला. तर दुसरीकडे पराजीत उमेदवारांनी निराशा व्यक्त केली. दरम्यान पक्षीय नेत्यांनी आपले उमेदवार निवडून येताच विजयी उमेदवारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तर कार्यकर्त्यांनी ढोलताशाच्या गजरात विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. अनेक विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here