


सिरोंचा (प्रतिनिधी )
मध्यरात्री कुटुंब गाढ झोपेत असताना आग लागली. झोपडीच्या घराला आगीने काही क्षणातच कवेत घेतले. यात घरातील 30 क्विंटल कापूस जळून खाक झाला. सुदैवाने कुटुंब थोडक्यात बचावल्याची घटना 10 फेब्रुवारीला सिरोंचा तालुक्यातील नृसिंहापल्ली येथे घडली.
रवींद्रशंकर चेन्नुरी रा. नृसिंहापल्ली हे झोपडीवजा घरात वास्तव्यास आहेत. 10 फेब्रुवारी रोजी चेन्नुरी कुटूंब नित्याप्रमाणे जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री अचानक घरातून आगीचे लोळ बाहेर पडण्यास सुरुवात झाली. पाहता- पाहता संपूर्ण घरात आग पसरली. यात वेचणी करून ठेवलेला 30 क्विंटल कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून खाक झाला. संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घराची आगीत राखरांगोळी झाली. यात अडीच लाखांचा कापूस व इतर साहित्य, असे पाच लाखांचे नुकसान झाल्याचा दावा रवींद्र चेन्नुरी यांनी केला आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे नेमके कारण समोर आलेले नाही. आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
वर्षभर केलेली मेहनत क्षणात गेली वाया
दरम्यान, चेन्नुरी यांना दोन एकर शेती आहे. दुसऱ्याची तीन एकर शेती त्यांनी कसायला घेतली होती. पाच एकर शेतीत मोठ्या कष्टाने त्यांनी कापूस पिकवला होता. कापसाचे दर सध्या गडगडले असल्याने दर वाढेल या आशेने त्यांनी त्यांनी कापूस विकला नव्हता. मात्र, आगीने घात केला व वर्षभर केलेली मेहनत क्षणात वाया गेली.