


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा(प्रतिनिधी)जिल्हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सिरोंचा तालुक्यातील अतिदुर्गम भागास भेट देऊन नागरीकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणुन घेतल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी आपल्या दौऱ्यास सिरोंचा तालुक्यातील वडधमपासून सुरू केला. या दौऱ्यात छत्तीसगढ टोकावर असलेल्या कार्ला, कोपेला, रमेशगुडम, झिंगाणूर गावा पर्यंत पोहचून नागरीकांच्या समस्या जाणल्या. तालुक्यातील अंकीसा ग्राम पंचायत, आरोग्य उपकेंद्र, आसरअल्ली ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना तेथून थेट नक्षलग्रस्त अतिदुर्गम अतिसंवेदशील असलेले झिंगानूर परिसरातील कार्ला, कोप्पेला, रमेशगुडम भागात नागरीकांच्या घरी पोहचल्या.
नागरीकांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणल्या. झिंगानुर परिसरात पाण्याची भीषण टंचाई आहे. शासनाने जलजीवन मिशन योजना अंतर्गत प्रत्येक गावातील प्रत्येक घरात पाणी पोहोचवावे या हेतूने सुरू केले आहे. मात्र काही ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत
असल्याने लोकांना पाण्याची टंचाई भासत आहे. काही ठिकाणी पाईप लाईन योग्य लेव्हलवर नसल्याने काही लोकांच्या घरी पाणी पोहचत नसल्याचे आणि काही लोकांनी अद्याप पाणीच आले नसल्याचे निदर्शनास आणुन दिले. रमेशगुडम येथील नागरीकांनीही पाण्याची समस्या मांडली. आतापर्यंत कोणतेही अधिकारी घरी आले नाहीत. मात्र आपण थेट आमच्या घरी येऊन समस्या जाणून घेतल्या म्हणून लोकांनी आनंद व्यक्त केला.
रमेशगुडम हे गाव अगदी इंद्रावती नदीच्या काठी छत्तीसगडच्या टोकावर असून सुद्धा येथील पाण्याची भीषण टंचाई असल्याने इंद्रावती नदीतून पाणी आणून घेत असल्याची माहिती नागरीकांनी दिली. लोकांना नदीकाठी जाण्यासाठी मार्ग नसल्याने पाणी आणण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याचे लोकांनी सांगितले असता उपस्थित संवर्ग विकास अधिकारी तसेच ग्रामसेवक यांना नदीकाठापर्यंत सीसी रस्त्याचा प्रस्ताव तयार करून पाठवा आणि माझा पुढच्या दौऱ्यापर्यंत नदीकाठा पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता झाला पाहिजे अशा सूचना दिल्या.