




गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (विशेष प्रतिनिधी )
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाद्वारे जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्र तसेच आरोग्य पथकात वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र मागील अनेक वर्षापासून तालुक्यातील बामणी आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारीचे पद रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड कायम आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत बामणी आरोग्य पथकालाही कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी आविसं तालुकाध्यक्ष तथा कॉंग्रेस नेते बानय्या जनगाम यांनी केली आहे.
तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र टेकडाताल्ला अंतर्गत बामणी आरोग्य पथकात बामणी, वेंकटापूर, ग्लासफोर्ड पेटा, वेनलाय्या, बोरामपल्ली, गरकापेटा आदी गावांचा समावेश आहे. या गावातील हजारो नागरीक याच केंद्रातून आरोग्य सेवा घेत आले आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून येथे कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने या परिसरातील रुग्णांना नाईलाजास्तव परिसरातील बोगस डॉक्टरांकडून उपचार घ्यावा लागत आहे. यामुळे यातून त्यांची आर्थिक फसवणूकही होत असून मानसीक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. बामणी आरोग्य पथकाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील रुग्णांचे हाल होत आहेत. नुकताच जिल्हा प्रशासकीय अधिका-यांनी पुढाकार घेत जिप आरोग्य विभागांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण तसेच दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 19 वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती केली. मात्र बामणी आरोग्य पथकाकरिता वैद्यकीय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिक-यांनी या परिसरातील नागरीकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता बामणी आरोग्य पथकाला कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी आविसं सिरोंचा तालुकाध्यक्ष तथा काँग्रेस नेते बानय्या जनगाम, सरपंच अजयआत्राम ,संतोष पडाला,सरपंच सूरज गावडे, रोहन अल्लुरी,श्रीनिवास घोडाम, यांनी केली आहे. अन्यथा आविस तसेच कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही जनगाम यांनी दिला आहे.