


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
अहेरी (प्रतिनिधी )
आलापल्ली येथील गोंड मोहल्ला वॉर्ड क्रमांक 4 मध्ये रविवारला सकाळच्या सुमारास राकेश फुलचंद कन्नाके या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. डोके व अंगावरील जखमांवरून त्याचा खून झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात होती. अहेरी पोलिसांनी या प्रकरणात तपासाची चक्रे वेगाने फिरवून एका महिला व पुरुषाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आलापल्लीच्या गोंड मोहल्ल्यात डॉ. किशोर नैताम यांच्या मालकीच्या खुल्या पटांगणात दिलीप तोडासे यांच्या घराच्या बाजूला रविवारला राकेश कन्नाके याचा मृतदेह चिखलाने माखलेल्या स्थितीत आढळला होता. ही माहिती मिळताच राकेशची पत्नी, आई, भाऊ व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राकेशच्या कपाळाला, डाव्या डोळ्यावर, चेहरा व नाकावर जखम होती. तसेच एक पाय मोडलेला होता. त्यामुळे राकेशचा खूनच झाला असावा, अशी शंका कुटूंबियांनी वर्तविली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखवून फॉरेन्सिक टीमसुद्धा पाचारण केले. श्वान पथक आणून व परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी एक महिला व पुरुषाला अटक केली असून कसून चौकशी सुरु आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलिस निरीक्षक संतोष मरस्कोल्हे, पोलिस अंमलदार संजय चव्हाण, पोलिस हवालदार किशोर बांबोळे करीत आहेत. अनैतिक संबंधातून राकेशची हत्या झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.