अहेरी येथील आयपीएल सट्टयाचे तेलंगणा कनेक्शन – तेलंगणातील दोन बुकिंना अटक

410

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
अहेरी- ( प्रतिनिधी)
आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावल्याप्रकरणी एप्रिल महिन्यात अहेरी पोलिसांद्वारे दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र यात आणखी काही आरोपींचा समावेश असल्याचा संशय अहेरी पोलिसांना होता. याअंतर्गत अधिक तपास केला असता तेलंगणा राज्यातील दोन बुकींना जेरबंद करण्यात अहेरी पोलिसांना यश आले आहे. शेख जमशेद पाशा बशीर शेख (32) रा. बिबरा पो. दहिगाम ता. शिरपूर जि. आसिफाबाद (तेलंगणा) व बुकी रवि लसमय्या गडीरेड्डी (28) रा. मुत्तमपेठ ता. कवटाला, जि. कुमरामभिम (तेलंगणा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
आयपीएलवर सट्टा खेळविल्या जात असल्याच्या गुप्त माहिती आधारे अहेरी पोलिसांनी विशेष मोहिम राबवुन 27 एप्रिल रोजी अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथे छापा टाकीत बनावटी अॅपच्या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आयपीएल क्रिकेटवर सट्टा लावणा-या निखील दुर्गे व आसिफ शेख यांना ताब्यात घेतले होते. अधिक तपासाअंती यात आसिफ फकीर मोहम्मद शेख, धंनजय राजरत्नम गोगीवार, निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण, इरफान ईकबाल शेख सर्व रा. अहेरी, व संदिप गुडपवार रा. आल्लापल्ली यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सट्टयात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने अपर पोलीस अधीक्षक अहेरी यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरी पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी बुधवारी, (दि. 8) तेलंगणा राज्यातून स्थानिक पोलीसांच्या मदतीने विशेष मोहिम राबवून ऑनलाईन सट्टा चालविणारा बुकी शेख जमशेद पाशा बशीर शेख, व रवि लसमय्या गडीरेड्डी या दोन्ही आरोपींना तेलंगणा राज्यातून अटक केली. मागील काही दिवसांपासून अहेरी तालुक्यात सुरु असलेल्या आयपीएल सट्टयामध्ये तेलंगणा राज्यातील सटोड्यांचाही सहभाग असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here