


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहेरी (प्रतिनिधी )
अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा गावात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तीने घराच्या अंगणात झोपलेल्या एका व्यावसायिकावर पेट्रोल ओतू त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत चरणदास गजानन चांदेकर (48) रा. छल्लेवाडा हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी तक्रार दाखल होताच रेपनपल्ली पोलिसांनी गांभीर्याने तपास करीत अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली. सोमवारी पोलिसांनी हरिदास मुंजमकर (46) रा. छल्लेवाडा असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छल्लेवाडा येथे आरोपी हरिदास मुंजमकर हा डीजे आणि मंडपाचा व्यवसाय करीत होता. अशा स्थितीत चरणदास चांदेकर यांनीही याच गावात डीजे आणि मंडपाचा व्यवसाय सुरू केला. गावातच स्पर्धक निर्माण झाल्याने हरिदासचा व्यवसाय बिघडू लागला. याच व्यावसायिक स्पर्धेतून संतापलेल्या हरिदासने चरणदास चांदेकर यांच्या हत्येचा कट रचला. शनिवारी रात्री चरणदास घराच्या अंगणात झोपले असताना त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न हरिदासने केले. या घटनेत चरणदास गंभीर जखमी झाला असून त्याचेवर चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान, रेपनपल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून अवघ्या 24 तासात आरोपी हरिदास मुंजमकर याला अटक केली. आरोपी हरिदासला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशी माहिती रेपनपल्ली पोलिसांनी दिली आहे.