


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
तालुका मुख्यालयापासून 35 किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 वर अवैधरित्या दारु तस्करी करणा-या तस्करासह असरअल्ली पोलिसांनी जेरबंद केले आहे. यावेळी पोलिसांनी दारू तस्कराकडून 3 लाख 52 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई सोमवारी, (दि.17) रात्री 8 वाजताच्या सुमारास सिरोंचा-पातागुडम मार्गावर पार पाडण्यात आली.
सिरोंचा-तागागुडम राष्ट्रीय महामार्गे अवैधरित्या दारूची तस्करी होत असल्याची माहिती असरअल्ली पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे असरअल्ली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी समाधान दौड यांनी पथकासह सोमवारी, रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पाळत ठेवली. दरम्यान वाहन क्र 02-3429 या क्रमाकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता 52 हजार 500 रुपये किंमतीची दारु तसेच 3 लाख रुपये किंमतीचे वाहन असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दारु तस्करीप्रकरणी सुरेश रमेश लग्गा रा. सिरोंचा याला अटक करण्यात आली. सदर कारवाई सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक समाधान दौड, पोलीस शिपाई राम गडदे, पोलीस शिपाई अनवाने, पोलीस शिपाई कळंबे, पोलीस शिपाई नळे यांनी केली आहे. पुढील तपास हवालदार अकुलावर करीत आहेत.