


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
गडचिरोली (प्रतिनिधी )
शुक्रवारच्या रात्री गडचिरोली तालुक्यातील दहा किमी अंतरावरील साखरा शेतशिवारात हत्तींनी धानपिकाची नासधूस केल्यानंतर आपला मोर्चा गडचिरोली नजीकच्या गोगाव शेतशिवाराकडे वळविला. शनिवारच्या रात्री हत्तींनी गोगाव परिसरातील जवळपास 30 एकरातील धानपीक पायदळी तुडवल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
कुरखेडा, आरमोरी तालुक्यातील शेतक-यांच्या धानपिकाचे नुकसान करीत रानटी हत्तींचा कळप गुरुवारला गडचिरोली तालुक्यातील पोर्ला वनपरिक्षेत्रात दाखल झाला. पोर्ला, नगरी, काटली असे मार्गक्रमण करीत हत्तींचा कळप शुक्रवारला साखरा शेतशिवारात पोहोचला. येथे रात्रभर हत्तींनी मोठ्या प्रमाणात धानपिकाचे नुकसान केले. त्यानंतर हत्तींनी आपला मोर्चा पाल नदीपरिसरातून गोगाव शेतशिवाराकडे वळविला. शनिवारच्या रात्री येथे पोहोचून हत्तींनी जवळपास 30 एकरातील धानपीक पायदळी तुडवले आहे. तसेच धु-यांचेही मोठे नुकसान केले आहे. ऐन कापणीवर आलेले पीक हत्तींनी जमीनदोस्त केल्याने शेतक-यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.