


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
आरमोरी (प्रतिनिधी )
गडचिरोलीवरून भरधाव वेगाने येणाºया टिप्परने आरमोरीवरून गडचिरोलीकडे येणाºया मोटारसायकलस्वारास धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील तीन युवक ठार झाल्याची घटना 21 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास गडचिरोली -आरमोरी मार्गावरील चुरमुरा गावाजवळ घडली. सुरज विलास मशाखेत्री (23) रा. इंदिरानगर चंद्रपूर, मनीष नेताजी मेश्राम (19) रा. विकासनगर तळोधी, ता. ब्रम्हपुरी, तुषार दशरथ मडावी (23) रा. संजयनगर चंद्रपूर अशी मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सुरज, मनीष व तुषार हे तिघेजण एमएच 34 बीडब्ल्यू 3702 क्रमांकाच्या मोटारसायकलने आरमोरीवरून गडचिरोलीकडे येत होते. तर गडचिरोलीवरुन एमएच 33 डब्ल्यू 0555 या क्रमांकाचा टिप्पर भरधाव वेगाने आरमोरीकडे जात होता. दरम्यान, गडचिरोली-आरमोरी मार्गावरील चुरमुरा गावाजवळ टिप्पर व मोटारसायकलची समारोसमोर धडक झाली. यात सुरज मशाखेत्री व मनीष मेश्राम हे दोन युवक जागीच ठार झाले. तर तुषार मडावी हा गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. परंतु तुषार मडावी याचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले. याप्रकरणी टिप्पर चालक दीपक कालीदास बानबले रा. पोर्ला व वाहक दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक चलाख करीत आहेत.
एका युवकाचे शिर धडावेगळे :
अपघात एवढा भीषण होता की, मृतक तिन्ही युवक टिप्परच्या चाकाखाली आल्याने एका युवकाचे शिर धडावेगळे झाले. तसेच शरीर पूर्णत: छिन्नविछिन्न झाल्याने पोलिसांना घटनास्थळावरून शरिरराचे तुकडे जमा करावे लागले. हे दृश्य पाहून पाहणा-यांच्या जिवाचा थरकाप उडाला. आरमोरी शहरात नवरात्रोत्सव सुरु असल्याने गडचिरोली-आरमोरी मार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. त्यातच अनेक दुचाकीस्वार भरधाव वेगात वाहन चालवत असल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे.