



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी )
धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सवलती देण्याच्या विरोधात गडचिरोली येथे 6 ऑक्टोंबर रोजी आदिवासी आरक्षण बचाव कृती सामितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 10 हजाराहून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले होते.
शिवाजी महाविद्यालय परिसरातून रविवारी दुपारी 1.30 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी तसेच जय सेवा, जय जोहारचे नारे देत मोर्चा दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा तीन किलो मिटरचा महामार्ग गर्दीने फुलून गेला होता. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आदिवासी समाजाचे नेते, ग्रामसंभाचे पदाधिकारी तसेच आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधीत केले. कुठल्याही परिस्थितीत अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश होऊ देणार नाही. वेळप्रसंगी वारंवार रस्त्यावर येऊ, असा इशारा यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकारला दिला. आंदोलनाचे नेतृत्व आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचे संयोजक पुष्पलता कुमरे, गुलाब मडावी, आनंद कंगाले, गणेश कोवे, आनंद मडावी, राजीवशहा मसराम, शिवराम कुमरे, विठ्ठल गेडाम, अमोल कुळमेथे, चरणदास पेंदाम, आरती कोल्हे, जयश्री येरमे, उमेश उईके, शिवाजी नरोटे यांनी केले. आंदोलनात अखिल भारीय आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ कार्याध्यक्ष घनश्याम मडावी, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गेडाम, महिला जिल्हाध्यक्ष वर्षा शेडमाके, जिल्हा सरचिटणीस गंगाधर मडावी, सदस्य गुरुदास मेश्राम, विविध पक्षाचे आदिवासी नेते, संघटना तसेच ग्रामसभांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येंनी सहभागी झाले होते.
आदिवासींच्या या आहेत प्रमुख मागण्या –
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येऊ नये, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी अधिनियमांतर्गत मोजणी झालेल्या वन पट्याचे आदिवासींना वाटप करण्यात यावे, पेसा अंतर्गत रखडलेली पदभरती तत्काळ घेण्यात यावी, कोरची येथील एकलव्य मॉडेल स्कूल इतरत्र स्थानांतरित करण्यात येऊ नये, आदिवासी आश्रमशाळा तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली डीबीटी योजना बंद करून पूर्वी प्रमाणेच सोयी- सुविधा उपलब्ध देण्यात याव्यात, आदिवासी उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने नियुक्ती न देता त्यांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, आरोग्य सुविधा 24 तास उपलब्ध करून देण्यात याव्यात, आदिवासी विकास विभागाचा निधी इतर कामासाठी खर्च करण्यात येऊ नये आदी मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनात आमदार डॉ. होळी ‘गो बॅक’चे नारे-
आदिवासींच्या महाआक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या अनेक आदिवासी नेत्यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले. यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांचे भाषण सुरू असताना मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. यातील काही युवकांनी ‘गो बॅक’ चे नारे सुद्धा लावले. यामुळे आमदार डॉ. होळींना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. व्यासपीठावरून कोणत्याही नेत्यांनी सरकार बद्दल न बोलता समाजाच्या विषयावर बोलावे, अशी तंबी देण्यात आली होती. मात्र यानंतरही आमदार डॉ. होळींनी सरकारच्या कामगिरीचा उल्लेख केल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त केला.