‘त्या’ प्रकरणातील आरोपी फरारच -ग्लासफोर्डपेठा येथे जादूटोण्याच्या संशयातून वृद्धेची गळा चिरुन हत्या

584

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
जादुटोण्याच्या संशयावरुन शेजारी राहणा-या इसमाने वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या केल्याची खळबळजन घटना सोमवारी, (दि.25) सिरोंचा तालुक्यातील ग्लासफोर्डपेठा येथे घडली होती. रुकमा बकय्या दुर्गम (64) असे मृत वृद्धेचे नाव असून बापू किष्टय्या कुम्मरी (38) असे आरोपीचे नाव आहे. हत्येनंतर दुस-या दिवशीही आरोपी फरार असून बामणी पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
प्राप्त माहितीनुसार बामणी उपपोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या ग्लासफोर्डपेठा येथील रुकमा दुर्गम ही वृद्ध महिला गावातील एका महिलेसह कपडे धुण्यासाठी गावालगतच्या नदीवर जात होती. दरम्यान आरोपी बापू कुम्मरी याने गावापासून काही किमी अंतरावर दोन्ही महिलांना गाठले. दुस-या महिलेला चाकुचा धाक दाखवित पिटाळून लावले. यानंतर वृद्ध महिलेच्या गळ्यावर चाकुने वार करीत तिची हत्या केली. बामणी पोलिसांनी घटनास्थळ गाठित पंचनामा केला. आरोपी हत्येनंतर गावातून फरार झाला आहे. बामणी उपपोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासह पुढील तपास बामणी उपपोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रमोद कुरसुंगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक दांडे करीत आहेत.

दोन वर्षापासून सुरु होता वाद-
मृतक रुकमा दुर्गम ही वृद्ध महिला एकटीच राहत असून तिच्या शेजारी आरोपी बापू कुम्मरी याचे घर आहे. आरोपीला रुकमा जादुटोणा करीत असल्याचा संशय होता. याच संशयातून दोन वर्षापूर्वी त्याचे रुकमा हिचेसोबत कडाक्याचे भांडणही झाले होते. त्यानंतर मात्र वातावरण शांत झाले होते. अशातच दोन दिवसांपूर्वी आरोपी बापूचे वृद्धेशी पुन्हा वाद झाला होता. अशातच सोमवारी त्यांनी चाकुने गळा चिरून तिची हत्या केल्याची शक्यता बामणी पोलिसांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here