


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
कमलापूर (प्रतिनिधी) सकाळच्या सुमारास घरातील सर्व मंडळी आपआपल्या कामात व्यस्त असतांना एकाएक घराला आग लागली, यात घरात ठेवलेल्या पेट्रोलचा भडका उडाल्याने दोन दुचाकींसह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना शनिवारी, (दि.22) सकाळी 10 वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे घडली.
सविस्तर वृत्त असे की, कमलापूर येथील महेश गादासवार हे कुटूंबियांसह सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे दैनंदिन काम करीत असतांना एकाएक घराला आग लागली. घरात पेट्रोल साठवून ठेवले असल्याने आगीने क्षणातच रौद्ररुप धारण केले. बघता बघता घरातील आग अंगणापर्यंत पोहचली. यात अंगणात उभ्या असलेल्या दोन दुचाकींसह घरातील दैनंदिन साहित्य जळून खाक झाल्या. गादासवार कुटूंबियांनी वेळीच सतर्कता बाळगित घराबाहेर पडल्याने सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घराला आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत आग विझविली. ग्रामस्थांनी दाखवलेल्या तत्त्परेतमुळे वेळीच आग नियंत्रणात आली. अन्यथा आजुबाजूच्या घरानांही आग लागण्याची शक्यता बळावली होती. मात्र, या आगीत दोन दुचाकींसह घरातील दैनंदिन साहित्य जळून खाक झाल्याने महेश गादासवार यांचे प्रचंड नुकसान झाले.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली
प्राप्त माहितीनुसार कमलापूर गादासवार हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या घरी पेट्रोल तसेच गॅस सिलेंडर साठवून ठेवलेले होते. या आगीमुळे पेट्रोलचा भडका उडाला. घरात तसेच घराबाहेर सिलेंडर ठेलेले होते. सुदैवान या गॅस सिलेंडरचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे बोलल्या जात आहे.