


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
चामोर्शी (प्रतिनिधी )
महाशिवरात्री निमित्त चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे भरणाऱ्या यात्रेकरिता चंद्रपूर येथील काही भाविक आले होते. ते वैनगंगा नदीपात्रात साखरी घाट (चंद्रपूर हद्द) आंघोळीसाठी गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने तीन जण बुडाले. त्यातील एकास जलसमाधी मिळाली तर दोन युवकांना वाचविण्यात यश आल्याची घटना आज, 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास घडली. अभिषेक संतोष मेश्राम (24) असे मृताचे तर जितू राजेश्वर दुर्गे (20), खुशाल सुखराम सोनवणे (18) असे बचावलेल्यांची नावे आहेत. सर्वजण चंद्रपूर येथील महांकाली वॉर्डातील रहिवासी आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर येथील महांकाली वार्ड, लक्ष्मी बजाज शो-रूम समोर रहात असलेले अभिषेक, जितू व खुशाल हे तीन व इतर काही जण असे पाच मित्र महाशिवरात्रीनिमित्त मार्कंडादेव येथे भरणाऱ्या यात्रेकरीता आले होते. यापैकी तीघे जण मार्कंडेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी साखरी घाट (चंद्रपूर जिल्हा हद्द) जवळ नदीत असलेल्या पुलाच्या तीन किमी अंतरावर आंघोळ करण्यासाठी गेले होते. तर दोन जण त्यांच्यापासुन वेगळे अंघोळ करत होते. दरम्यान, अभिषेक, जितू व खुशाल यांना नदीतील खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडत असताना इतर उपस्थित भाविकांनी आरडाओरड केली. दरम्यान, जवळ असलेल्या नागरिकांनी धावपळ करून जितू व खुशाल या दोन युवकांना वाचवले. मात्र अभिषेक या युवकाला जलसमाधी मिळाली. एसडीआरएफचे 5 बचाव पथक नदीत तैनात होते. मात्र बुडालेला भाविक हा मंदिरापासून फार लांब अंतरावर आणि कुठलीही कल्पना नसल्याने त्याला वाचवू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलिस पथक, आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले. अभिषेकचा मृतदेह शोधून काढला. झिरो गुन्ह्याची नोंद करुन पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, पोना अविनाश कासशेट्टीवार करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी रणजित यादव, प्रभारी तहसीलदार अविनाश शेबटवार, नायब तहसीलदार राजू वैध यांनी घटनास्थही भेट दिली.