


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सातपुड्याच्या पायथ्यास लागून
लांबच लांब
निर्हेतुक वाहात जाणारा फाटका रस्ता
ग्रिष्मातील तप्तधारांत
न्हात राहातो
भर दुपारच्या प्रहरी
नजर आंधळून जावी तिथपर्यंत….
मृगजळाने बंदी केलित
हिरवी स्वप्न.
मिटून घेतलेत पंख
भेदरलेल्या पाखरांनी.
नांग्या उभारून उन्मत्तपणे
फिरताहेत विंचू
एकेकास हेरून
मारण्यास डंख.
उंचच उंच
पण
आपल्या पाचाळोळ्याला कवटाळून
नैराश्याचे उसासे टाकत,
उभं आहे
निष्पर्ण सागाचं बण.
कसले दिवस आले वाट्याला
म्हणून खंतावत,
आपल्या सळसळत्या हिरवाईची
आठवण काढत.
मुसमुसतंय जंगलातलं हरेक झाड.
पाखरांची किलबिल नाही,
सश्या हरणांची
चाहूल नाही,
की नाही खारीची सरसर .
ओढ्याचा नाद नाही,
की कोल्ह्याची
कुईकुई नाही.
माकडांचा मात्र सुळसुळाट
वाढलाय अतोनात.
हौदोस घालताहेत
जंगलभर.
वाघाच्या तिष्ण डरकाळ्यांनी
साऱ्या जंगलालाच जशी
हीव भरली,
कंठ आक्रसून,
दुमडून घेतलंय साऱ्यांनी
स्वत:ला स्वत:त.
मान टाकून पडलंय
सारं रान.
नैराश्येने घेरलेल्या डोंगरमाथ्यावर
निळ्याभोर नभाखाली
पळस मात्र फुलून आलेत
आपल्या लालभडक ज्वाळानिशी.
सारंच काही
संपलं नाही,
सारंच काही
संपणार नाही,
संपू देणार नाही,
हे सांगत उभे आहेत ते
तिक्ष्ण दुपारच्या ग्रिष्मात
०००००००००००००००
प्रा.प्रसेनजीत एस.तेलंग
०००००००००००००००००
( फोटो- दशरथ मांझी यांनी गेहलौर(गया-बिहार) मध्ये सातत्याने बावीस वर्षे एकट्याने पहाड फोडून काढत गावाच्या सोईसाठी रस्ता तयार करण्याचे अवघड कार्य पार पाडले. हे कार्य पूर्णत्वास जात असतांना दशरथ मांझी गावात उपहासाचे धनी ठरत होते. आज तेच मांझी गावाचा अभिमान विषय ठरले आहेत. हाच तो पहाडआणि त्यात कोरलेला रस्ता.)