


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (तालुका प्रतिनिधी)
केंद्र शासनाद्वारे अॅग्रीस्टूक योजनेअंतर्गत शेतक-यांची फार्मर आयडी नोंदणी केली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतक-यांना विविध योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ व सोयीस्कर ठरणार आहे. याअंतर्गत तालुका प्रशासन सज्ज झाले असून सिरोंचा येथे भरणाऱ्या सोमवारी बाजारात तहसीलदार व नायब तहसीलदार व कर्मचारी तेलगू भाषेसह इतर भाषेत अधिकाधिक शेतक-यांची नोंदणी व्हावी, या उद्देशाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून प्रशासनाद्वारे जनजागृतीतून शेतक-यांना नोंदणीसाठी उद्यूक्त केले जात आहे.
केंद्र शासनाद्वारे अॅग्रीस्टॅक अशी महत्वाकांशी योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत फार्मर आयडी नोंदणी करणा-या शेतक-यांनाच शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. याअंतर्गत सिरोंचा तालुक्यात सर्वच सीएससी केंद्रावरुन शेतक-यांची फार्मर आयडी नोंदणी केली जात आहे. मात्र, तालुक्याचा बराचसा भाग दुर्गम क्षेत्रात मोडत असल्याने शेतक-यांची नोंदणीस अडचणी येत आहेत. हीच बाब हेरुन तालुका प्रशासनाद्वारे अधिकाधिक शेतक-यांची नोंदणीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. फॉर्मर आयडीसाठी जमिनीचा सातबारा, आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक असणे अत्यावश्यक आहे. तालुका मुख्यालय असलेल्या सिरोंचा येथील आठवडी बाजारात भाजीपाला खरेदसाठी परिसरातील बहूसंख्य शेतकरी हजेरी लावित असल्याने या उपक्रमाचा एक भाग म्हणून सिरोंचा शहरातील आठवडी बाजारात खुद्द तहसिलदार निलेश होनमारे, नायब तहसिलदार हमीद सय्यद यांनी नागरिकांना फार्मर आयडी नोंदणीचे आवाहन केले. तालुका प्रशासनाच्या या स्तुत्य उपक्रमामुळे तालुक्यात फार्मर आयडी नोंदणीला शेतक-यांचा प्रतिसाद वाढण्याची चिन्हे आहेत.