


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या व तेलंगणा राज्य सीमेलगत असलेल्या गोदावरी नदीवरील कालेश्वर सेतू नावाने ओळख झालेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या पुलाला ठिकठिकाणी पडलेल्या भेगा दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असले तरी बांधकामादरम्यान संबंधित प्रशासनाने कमालीचा निष्काळजीपणा बाळगला असल्याने या आंतरराज्यीय मार्गावर रात्रोच्या सुमारास अपघाताचा धोका बळावला आहे.
सिरोंचा लगत असलेल्या गोदावरी नदीवर तेलंगणा व महाराष्ट्र राज्य प्रशासनाच्या वतीने पुलाची उभारणी करण्यात आली. या पुलालगतच तेलंगणा राज्यातील कालेश्वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने सदर पुल कालेश्वर सेतू म्हणून ओळखला जातो. या मार्गे आंतराज्यीय वाहतूक होत असल्याने या पुलावरही नेहमीच वर्दळ असते. दरम्यान काही महिन्यांपूर्वी या पुलाला भेगा पडल्याने तसेच सळाखी निघाल्याने वाहनधारकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत होता. वाहनधारकांच्या तक्रारी वाढल्याने संबंधित विभागाने सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. याअंतर्गत सद्यस्थितीत पुलाला पडलेल्या भेगा दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र या कामादरम्यान संबंधित कंत्राटदाराद्वारे रस्ता बांधकामाचे नियमांचे उल्लंघन केल्या जात असल्याचे निदर्शनास येत आहे. दुरुस्ती कामादरम्यान काम सुरु असल्यासंदर्भात सुचना देणारे फलक लावणे अगत्याचे आहे. मात्र संबंधित कंत्राटदारामार्फत असे कोणतेही फलक न लावता बांधकामस्थळी केवळ ड्रम ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ड्रमला रिप्लेक्टर वा पांढरा रंग लावण्याचीही तसदी घेण्यात आली नाही. परिणामी रात्रोच्या सुमारास प्रवास करणा-या वाहनधारकांना सदर ड्रम निदर्शनास येत नसल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. आंतरराज्यीय महामार्ग असल्याने सदर पुलावरुन चोवीस तास अवजड वाहनांसह चारचाकी, दुचाकी वाहनांची वर्दळ असते. रात्रोच्या सुमारासही ही वर्दळ कायम असते. पुल बांधकाम दुरुस्तीदरम्यान कमालीचा निष्काळजीपणा बाळगल्या जात असल्याने रात्रोच्या सुमारास या पुलावर अपघात घडून जीवतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याकडे जातीने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांकडून होत आहे.