


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी)
शॉर्टसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्यासह संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी, (दि.7) सकाळी 11 वाजताच्या सुमारास सिरोंचा शहरातील प्रभाग क्र. 16 येथे घडली. या आगीत गणेश पोचम मंचार्ला यांचे जवळपास दहा लाखांचे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार गणेश मंचार्ला यांच्या घरी लग्न कार्य असल्याने त्यांचे संपूर्ण कुटूंबिय लग्न पत्रिका लावण्यासाठी शेजाराच्या घरी बसून होते. दरम्यान सकाळी 11 वाजताच्या सुमारास घरात शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. याची माहिती मंचार्ला यांना मिळताच संपूर्ण कुटूंबियांनी घराकडे धाव घेतली. मात्र तोपर्यंत घरातील जीवनावश्यक वस्तुंसह नगदी पैसे असा एकूण 9 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जळून खाक झाला. घटनेची माहिती प्राप्त होताच तहसीलदार निलेश होनमारे यांच्या आदेशान्वये तलाठी पदा यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
लग्न सोहळ्याची जमापूंजी आगीच्या भक्षस्थानी
गणेश मंचर्ला यांच्या घरी पंधरा दिवसांवर लग्नसोहळा होता. या लग्नसोहळ्यासाठी त्यांनी लग्नसमारंभाचे कपडे, भांडेकुंडी, दागिने खरेदी केले होते. या आगीत त्यांचे कच्चे घर 1 लाख 50 हजार लग्न समारंभाचे कपडे 80 हजार, धान्य 20 हजार, इलेक्ट्रिक वस्तू 30 हजार नगदी पैसे 4 लाख 50 हजार, भांडे 20 हजार, दागिने 30 हजार, फर्निचर 20 हजार असा एकूण 9 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीत घरासह लग्न कार्यासाठी घेण्यात आलेले सर्व साहित्य भस्मसात झाल्याने गणेश मंचर्ला यांचेवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.