गडचिरोली येथील हत्या प्रकरणात,भाडेकरुच निघाला ‘त्या’ महिलेच्या हत्यारा -आरोपीस पुणे येथून अटक

450

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी)
जिल्हा मुख्यालयापासून लगतच असलेल्या नवेगाव येथे कल्पना केशव उंदीरवाडे या निवृत्त महिला अधिका-याची अज्ञात व्यक्तीद्वारे हत्या घडवून आणल्याची घटना 13 एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेमुळे जिल्हा मुख्यालय परिसरात एकच खळबळ उडाली होती. गडचिरोली शहर पोलिसांसह एलसीबी पथकाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या सहा दिवसात आरोपीचा छडा लावित संबंधित महिलेच्या भाडेकरुस पुणे येथून अटक केली आहे. विशाल ईश्वर वाळके (40) रा. ता. एटापल्ली असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल वाळके हा दोन वर्षांपासून मृत महिला अधिकारी उंदीरवाडे यांच्या घरात भाड्याने राहत होता. लोकांकडून पैसे उधार घेतल्यामुळे विशाल कर्जबाजारी झाला होता. दरम्यान, 13 एप्रिलला विशालने चोरीच्या उद्देशाने घरमालकाच्या घरात प्रवेश केला. मृत महिला घरमालक महिलेला ही बाब लक्षात आली अशातच आरोपीने तिच्यावर हत्या करीत महिलेचे मंगळसुत्र व चैन घेऊन घटनास्थळावरुन फरार झाला होता.
निवृत्त महिला अधिकारी असलेल्या भाडेकरु महिलेची हत्या केल्यानंतर आरोपीने घटनास्थळी कोणताही पुरावा ठेवला नव्हता. त्यामुळे सदर हत्या प्रकरण शहर पोलिसांसमोर आव्हान ठरले होते. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात विशेष तीन पथक गठित करण्यात आले होते. तपासाची चक्रे फिरविली असता भाडेकरुच खुनी असल्याचे उघड झाले. मात्र आरोपी पोलिसांना गुंगारा देत ठिकठिकाणी फिरत होता. अखेर शुक्रवारी आरोपीस पुणे येथून अटक करण्यात आली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालायाने आरोपीस पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदर कारवाई वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार रेवचंद सिंगनगुडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल आव्हाड, गडचिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, महिला पोलीस उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे आदींनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here