


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी)
अहेरी येथील 19 वर्षीय तरुणीवर दीर्घ कालावधीपासून शारीरिक व मानसिक छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील युवकाने तरुणीचा विश्वासघात करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करून बदनामी केली. या प्रकरणी अहेरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव शाहनवाज मलिक (22) रा. मेरठ, (उत्तर प्रदेश) असे आहे. त्याला दिल्लीमधून अटक करण्यात आली.
पीडितेची आरोपीशी ओळख जून 2023 मध्ये इंस्टाग्रामवर झाली होती. काही दिवसांतच आरोपी अहेरीत सेंट्रींगच्या कामासाठी आला आणि 11 जून रोजी त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. त्यानंतर जुलै महिन्यात आरोपीने पीडितेला आपल्या रूमवर बोलावून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिचे फोटो काढले. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने या फोटोंचा वापर करून तिला वारंवार ब्लॅकमेल केले व पुढेही अनेक वेळा तिच्यावर जबरदस्ती केली. व्हिडिओ कॉलद्वारे देखील तिचा मानसिक छळ करण्यात आला. जेव्हा पीडितेने तिचे लग्न ठरल्याची माहिती दिली, तेव्हा आरोपीने ‘कोणासोबतही लग्न करू देणार नाही, तुला मारून टाकेन’ अशी धमकी दिली. यानंतर आरोपीने तिचे अश्लील व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर करून तिची बदनामी केली.
या प्रकरणी आयपीसी 2023 च्या कलम 64 (1), 64 (2)(एम), पोस्को कायदा 2012 अंतर्गत कलम 4 व 6, तसेच आयटी अॅक्ट 2000 चे कलम 66 (C) आणि 66(इ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीला दिल्ली येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला 21 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील ईज्जपवार करीत आहेत.