


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
जिमलगट्टा (प्रतिनिधी)
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा येथील जिल्हा को-ऑपरेटिव्ह बँक शाखेत परिसरातील 25 गावातील लोकांचे खाते आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना बॅंक व्यवहारासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मागील 3 दिवसांपासून रांगेत राहून खातेदार पैसे काढण्यासाठी तुफान गर्दी करीत आहेत. काही ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
जिमलगट्टा बँकेत नागरिकांची गर्दी
अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा या गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून गावाची शहरीकरणाकडे वाटचाल सुरु आहे. जिमलगट्टा हे परिसरातील मध्यवर्ती व मोठे गाव असल्याने जवळपास 20 ते 25 गावातील लोकांचा या गावाशी संपर्क असतो. या गावात को-ऑपरेटिव्ह बँकेची एकमेव शाखा आहे. अनेक खातेदार या शाखेशी जुळले आहेत. त्यामुळे रोज या शाखेत अनेक ग्राहकांची गर्दी असते. शासनाच्या लाडकी बहीण योजेनेचे पैसे खात्यात जमा होऊ लागले तेव्हापासून या बॅंकेत महिलांच्या गर्दीचे प्रमाण वाढले आहे. या शाखेत आधीच अपुऱ्या सुविधा, कर्मचारी कमी त्यातच महिलांची पैसे काढण्यासाठीची गर्दी यामुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. जिमलगट्टा परिसरात 20 ते 25 गावे येतात. या गावांसाठी एकच बँक शाखा असल्याने खातेदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हा भाग दुर्गम असल्याने उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसासाठी येथील नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी आतापासूनच तयारीला लागले आहेत. त्याकरिता बँकेतून पैसे काढण्यासाठी खूप दुरवरून नागरिक येत आहेत. मात्र एकच बँकेची शाखा असल्याने अनेक ठेवीदारांना रांगेत उभे राहून आपली रक्कम काढावी लागते. बँकेतील रिक्त पदामुळे आणि नियमित वीज राहत नसल्याने बँकेतून पैसे लवकर अदा होत नाहीत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून या बॅंकेत ग्राहकांची मोठी गर्दी उसळली असून अनेक ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. अनेक ग्राहक 50-60 किमी अंतरावरून येत असल्याने त्यांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. अगोदरच या परिसरात दळणवळणाच्या अपु-या सुविधा असल्याने अनेकांना मुक्कामी राहावे लागत आहे. शासन विकासाच्या बाता मारत असले तरी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही या भागात बॅंकेची सुविधा निर्माण न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिमलगट्टा परिसरात दुसरी बॅंक शाखा निर्माण करावी, अशी मागणी जोर धरत आहे.