


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
चामोर्शी (तालुका प्रतिनिधी)
अपघातास कारणीभूत ठरलेल्या आरोपीस चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दिक्षा डी. विघ्ने यांच्या न्यायालयाने 20 मे रोजी 1 वर्ष सश्रम कारावास व 4 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. रविंद्र सुखदास तोडासे (40) रा. चितेगाव ता. मूल जि. चंद्रपूर असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर असे की, 8 जानेवारी 2017 रोजी जखमी संजय रघुनाथ वानखेडे (37) हा त्याच्या बहिणीला घेवुन मुलवरून चामोर्शीकडे दुचाकी वाहनाने येत होता. भेंडाळा गावाजवळ आरोपी रवींद्र तोडासे हा त्यांच्या ताब्यातील धानाचे ट्रक घेवुन चामोर्शीवरून मुलकडे जात असतांना आरोपीच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवुन संजय रघुनाथ वानखेडे व त्यांच्या बहिणीचा अपघात करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर घटनास्थळावरून पळून गेला. याबाबतची तक्रार संजय वानखेडे यांनी पोलिस स्टेशन चामोर्शी येथे दिली. पोलिस हवालदार आनंद टेकाम यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षाने साक्षदाराचे साक्ष नोंदवुन दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आरोपी कलम 279, 337, 338 भादंवि तसेच मोवाकाचे कलम 134 व 184 नुसार दोषी ठरल्याने चामोर्शी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी दिक्षा विघ्ने यांनी आरोपीस विविध कलमानुसार 1 वर्ष सक्षम कारावास व 4 हजार रुपये दंड तसेच जखमींना 15000 हजार रुपये नुकसान भरपाईचे आदेश दिले.