



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
अहेरी (प्रतिनिधी)
खरीप हंगाम तोंडावर येताच अहेरी तालुक्यात अनधिकृत प्रतिबंधित एटीबीटी कापूस बियाणे विक्रीस उधाण आले आहे. अहेरी कृषी विभाग व पोलिसांद्वारे यावर अंकुश लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहे. अशातच कृषी विभाग व अहेरी पोलिस पथकाने शनिवारी, (दि.25)दुपारी 1.40 वाजता तालुक्यातील टेकमपल्ली गावात एका व्यक्तीच्या घरी धाड टाकून 4 लाख 68 हजार रुपये किंमतीचे तब्बल 234 किलो संशयित अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे जप्त केले. याप्रकरणी बाबुराव भैय्याजी नैताम रा. टेकमपल्ली यास अटक करण्यात आली आहे.
तालुका मुख्यालयापासून 11 किमी अंतरावर असलेल्या टेकपल्ली येथील बाबुराव नैताम या व्यक्तीच्या घरी अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त झाली. याची माहिती मिळताच अहेरी पोलिस तसेच कृषी विभागाच्या अधिका-यांनी रविवारी, दुपारच्या सुमारास नैताम याचे घरी धाड टाकली. घराची झडती घेतली असता 9 पिव्यांमध्ये तब्बल 234 किलो संशयित अनधिकृ एटीबीटी कापूस बियाणे आढळून आले. या बियाण्यांची किंमत 4 लाख 68 हजार 468 रुपये एवढी आहे. नैताम यांची सखोल चौकशी केली असता त्याने सदर बियाणे सांभाशीराव गिंजूपल्ली रा. गुकुर हल्ली मुक्कामी नागेपल्ली यांचे असून त्यांनी शेतीसाठी काही औषधे देण्याचे कबूल करीत माझेकडे काही कालावधीपुरता बियाणे ठेवण्यास दिल्याचे सांगितले. तालुका कृषी अधिकारी गुरव यांनी उपलब्ध साठ्यापैकी 6 नमूने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. तर उर्वरित साठा पोलीस स्टेशन अहेरी येथे जमा करण्यात आला. नैताम यास अटक करुन दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास अहेरी पोलिस करीत आहेत. सदर कारवाई उपविभागीय कृषी अधिकारी आनंद गंजेवार, तालका कृषी अधिकारी निखिल गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश वळवी आदींनी पार पाडली.