मिशन वात्सल्य” अंतर्गत स्पॉन्सरशीप शिबिरात ७५ बालकांना लाभ -दुर्धर आजारग्रस्त बालक व पालकांच्या मुलांना शासनाकडून दिलासा

16

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
गडचिरोली(प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या आदेशानुसार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली “मिशन वात्सल्य” योजनेअंतर्गत दुर्धर आधारग्रस्त बालकांसाठी विशेष स्पॉन्सरशीप शिबिराचे आयोजन २४ मे २०२५ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे करण्यात आले.

या शिबिरामध्ये ० ते १८ वयोगटातील एकूण ७५ लाभार्थ्यांना “मिशन वात्सल्य” योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यामध्ये ९ लाभार्थी हे स्वतः दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेले बालक होते, तर ६६ लाभार्थी हे दुर्धर आजारांनी प्रभावित पालकांची मुले होती. या योजनेतून आर्थिक व सामाजिक आधार मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिबिराला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा वर्षा मनवर, सदस्य काशिनाथ देवगडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर, डॉ. अभिषेक गव्हारे (CSO), आशिष कुकडे (प्रकल्प समन्वयक, विहान काळजी व आधार केंद्र), क्षेत्रीय कर्मचारी विनोद कोलते व सौ. रंजना पंदीलवार यांची उपस्थिती होती. लाभार्थी व त्यांच्या पालकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिबिराची सकारात्मक दखल घेतली.

या शिबिराच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांपर्यंत “मिशन वात्सल्य” योजनेचे फायदे पोहचविण्यात यश आले असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here