कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दे! – डॉ अनिल पावशेकर

52

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य लढतीत टीम इंडियाने किवी संघाची चिवट झुंज मोडून काढत अहमदाबादचे तिकीट कन्फर्म केले आहे. आयसीसी सामन्यात वारंवार गळफास बनलेल्या किवी संघाने यावेळी सुद्धा आपल्या संघाला चांगलाच घाम फोडला होता. मात्र टीम इंडियाच्या मो.शमी नामक बब्बर शेर ने न्युझीलंडचा फडशा पाडत किवीग्रहण संपुष्टात आणले. शमीने बळींचा सत्तेप सत्ता ठोकत पुन्हा एकदा या स्पर्धेत गोलंदाजीतील सिकंदर आपणच आहोत हे सिद्ध करून दाखवले आहे.
झाले काय तर आयसीसी स्पर्धेत न्युझीलंडचा अपशकून आपल्या पाचवीलाच पूजला होता. भलेही साखळी स्पर्धेत आपण धर्मशाळेत किवींवर मात केली असली तरी विलीयम्सच्या टीमचे उपद्रवमूल्य वादातीत होते. त्यातही या स्टेजवर चुकले तर सरळ घरवापसी असल्याने इथे चुकीला माफी नव्हती. काहीही करून कसेही करून किवीमर्दन केल्याशिवाय टीम इंडियाकडे तरणोपाय नव्हता. यासाठी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे गरजेचे होते आणि झालेही तसेच. किवींची गोलंदाजीची मदार बोल्ट, साऊदी आणि सॅंटनरवर होती. मात्र मुळावर घाव घातला की फांद्या आपोआप खाली झुकतात हे रोहीत जाणून होता. याच तत्त्वाला जागत त्याने बोल्टला दणके देत डावाचा प्रारंभ केला.
खरेतर या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत रोहीतची फलंदाजी दादागिरी सारखी झाली आहे. त्यामुळे धावगतीचा टेम्पो सेट होऊन येणाऱ्या फलंदाजांवर धावगतीचा दबाव राहत नाही‌. त्याने शुभमन सोबत सत्तरीची सलामी देत झकास प्रारंभ करून दिला. मात्र साऊदीने त्याला बाद करत त्याची घोडदौड रोखली‌. यानंतर शुभमनने विराटच्या साथीने फटकेबाजी केली परंतु तो क्रॅम्पमुळे हतबल झाला. ज्याप्रकारे मुंबईत फलंदाज क्रॅम्पग्रस्त होत आहेत (उदा. ग्लेन मॅक्सवेल, शुभमन, विराट, डॅरेल मिचेल इ.) ते पाहता खेळपट्टीवर फलंदाजांसाठी चारा, निवारा छावण्या उभारण्यास हरकत नसावी.
या सर्व धावपळीत अनुभवी विराटने श्रेयसला दिमतीला घेत डावाला आकार दिला. विराटच्या फलंदाजी बाबत काय बोलावे? सचिनचा शतकांचा विक्रम त्याच्याच उपस्थितीत मोडत त्याने आपले ५० वे शतक झळकावले. अगदी कॉपी बुक स्टाईल फलंदाजी करत त्याने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. एका टोकाला विराटची दर्जेदार फलंदाजी होती तर दुसरीकडे श्रेयसच्या अफाट ताकद आणि टायमिंगने किंवींना नामोहरम केले होते. श्रेयसने चार चौकार आणि आठ षटकारांच्या साहाय्याने आपले तुफानी शतक पूर्ण केले. विराट, श्रेयसच्या शतकी दणक्याला कळस चढवला तो राहुलच्या विस चेंडूतील क्लासी चाळीसीने.
एकतर उपांत्य सामना, त्यातही चारशेचा पाठलाग म्हणजे एक दिव्य होते. तरीपण प्रतिस्पर्धी न्यूझीलंड म्हणजे बिते हुए लम्हों की कसक, साथ होती! सोबतच मुळचे भारतीय परंतु इतर देशांकडून खेळणारे खेळाडू नेहमीच आपल्या संघाला छळत असतात. मग तो विंडीजचा चंदरपॉल असो की आत्ताचे ईश सोढी, रचिन रविंद्र. तरी बरे झाले शमीने किवींच्या सलामीवीरांना लवकरच निरोप दिला. मात्र केन विलियम्स आणि डॅरेल मिचेलने झुंजार खेळी करत टीम इंडियाच्या तोंडचे पाणी पळविले. दोघांनीही सावध, तितकीच आक्रमक फलंदाजी करत सामन्यात रंग भरला. ज्याप्रकारे हे दोघे खेळत होते ते पाहता चारशे काय, पाचशे धावा सुद्धा पार करतील असे वाटत होते. वेगवान गोलंदाज असो की फिरकीपटू, दोघांचाही योग्य समाचार घेत या दुक्कलीने रोहीतला चांगलेच हैराण केले होते.
काही केल्या ही चिक्कट, चिवट आणि खडूस जोडी कोणत्याही गोलंदाजांना जुमानत नव्हती. या जोडीने जवळपास १८० धावांची भागीदारी करत सामना किवींकडे झुकवला होता. भलेही धावगती वाढत होती पण या जोडीच्या खात्म्याचा विडा कोण उचलणार हा यक्षप्रश्न होता. कारण या दोघांनी आमचं ठरलंय सारखं खेळत फलंदाजीची वज्रमूठ बांधली होती. मैदानात स्मशान शांतता पसरली होती. बळी मिळत नसल्याने भारतीय खेळाडूंची देहबोली सर्वकाही सांगून जात होती तर चाहत्यांच्या नजरेत बळींची तृष्णा स्पष्ट झळकत होती. कित्येक चाहते मन मारून, टिव्ही बंद करून भरल्या मनाने भाऊबीज साजरी करत होते. आपल्या संघाचे नष्टचर्य केंव्हा संपेल काही कळायला मार्ग नव्हता.
अखेर काळ्या ढगाला रुपेरी, चंदेरी किनार गवसली. बुमराहच्या रुपात एक रहनुमा संघासाठी धावून आला. बुमराहच्या गोलंदाजीवर गले की हड्डी बनलेल्या विलीयम्सचा झेल उडाला पण शमीने ही सुवर्णसंधी गमावली. एका क्षणासाठी लाखो करोडो सुस्कारे सोडले गेले. कोई जब तुम्हारा ह्रदय तोड दे म्हणजे काय असते ते सर्वांनी अनुभवले. जणुकाही टाईम ट्रॅव्हल करून शमीने तो सुटलेला झेल पुन्हा पकडावा असे मनोमन वाटत होते. मात्र प्रत्यक्षात असं काही घडत नाही. शमी वर दबाव प्रचंड वाढला होता. मात्र सर्वांना त्याच्याकडूनच अपेक्षा होत्या. कारण तुम्ही ने दर्द दिया और तुम्ही ने दवा देना, हे समयोचीत होते, तेवढी क्षमता, धमक त्याच्यात नक्कीच होती आणि झालेही तसेच.
किवीं सव्वादोनशेच्या टप्प्यात असतांना शमीने विलियम्सचा गेम केला. सीमारेषेवर सूर्याने सुरेख झेल टिपत विलीयम्सची वेलिंग्टनची वारी निश्चित केली. लगेचच डबल धमाका करत त्याने टॉम लाथमला लोळवले. मात्र खेळपट्टीवर अजूनही डॅरेल मिचेल काळ बनून उभा होता. डोक्यावरून घामाच्या धारा वाहत असतांना, पायात क्रॅम्प असतांनाही तो धीरोदात्तपणे संघाच्या विजयासाठी धडपडत होता. त्याने ग्लेन फिलीप्ससोबत पाऊनशे धावांची भागीदारी करत किवींची धडधड कायम ठेवली होती. खेळपट्टीवर मिचेलचा जम बसल्याने त्याला बाद करणं कठीण होतं तर फिलिप्स अवखळत का होईना धावा गोळा करत होता. अखेर बुमराहने त्याच्या खेळीला विराम दिला. दुसरीकडे कुलदीपने माफक गोलंदाजी करत चॅपमनचा बळी घेतला.
सहा गडी बाद होताच किवींच्या हातून सामना निसटायला लागला. किवींची एकमेव लाईफ लाईन असलेल्या मिचेलचा धीर खचला होता. तर बुमराह कुलदीपने शमीचा भार हलका केल्याने शेवटच्या स्पेलमध्ये शमीने न भुतो न भविष्यती कामगिरी केली. त्याने मिचेल सहित किवींचे शेपूट निर्दयपणे छाटतांना एकंदर सात बळी घेतले. पहिल्या काही सामन्यांत आपल्या संघसहकाऱ्यांना पाणी पाजणाऱ्या शमीने संधी मिळताच प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या भन्नाट गोलंदाजीचे पाणी पाजले. लेंथ आणि लाईनवर जबरदस्त नियंत्रण ठेवत शमीने विरोधी फलंदाजांना चित केले. या लढतीत फुल लेंथ, गुड लेंथचा मारा करत, एकाच टप्प्यात चेंडू टाकून कधी आंत कधी बाहेर काढल्याने त्याची गोलंदाजी फलंदाजांसाठी भुलभुलैय्या ठरली होती.
थोडक्यात काय तर योग्यता असतांनाही बेंचवर बसून राहण्याची सजा भोगून त्याने जीगरमां बडी आग है, हे दाखवून दिले. तर न्यूझीलंड संघाने आपल्या नावारूपाला जागत कडवी झुंज दिली. विशेषतः विलीयम्स, मिचेलची भागिदारी दृष्ट लागण्यासारखी होती. फलंदाजीत किवींनी दम मारो दम केले परंतु गोलंदाजीत ते ढेपाळले. रोहीत, शुभमन, विराट, श्रेयस आणि राहुलला ते वेसण घालू शकले नाहीत. मुख्य म्हणजे त्यांचा हमखास बळी टिपणारा मॅट हेन्री संघात नसल्याने त्याचा चांगलाच फटका त्यांना बसला. आपल्या गोलंदाजांनी सुद्धा या सामन्यात थोडी स्वैर गोलंदाजी करत तब्बल २९ अवांतर धावा दिल्या ज्यात १९ चेंडू वाईड होते. तसेच क्षेत्ररक्षणातही ढिसाळपणा जाणवला गेला. मात्र शेवटी निकाल आपल्या बाजूने लागल्याने ही बाब लपल्या गेली. या लढतीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाले तर,, किवींनी छळले होते, शमी ने सुटका केली, असे करता येईल.

दि. १६ नोव्हेंबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here