रमाईचा त्याग,कष्ट आणि स्वाभिमानी संघर्ष समजून घेतांना अश्रू अनावर होतात!.. (माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा लेख भारताचे महानायक महानायिका पुस्तकातून साभार..) रामेश्वर तिरमुखे, 09420705653

175

 

रामेश्वर तिरमुखे, 09420705653

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
माता रमाबाई आंबेडकर यांचा जीवन संघर्ष हा अनेकदा समाजातील आणि स्त्रिया व पुरुष यांना माहिती नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. या संदर्भाने लेखनही फारच थोडे आहे.जाणीवपूर्वक सोसिएल मीडियाच्या माध्यमातून आमच्या सर्व स्त्रिया आणि पुरुष यांना माता रमाईचा परिचय व्हावा म्हणून हा एक प्रयत्न आहे. निश्चितपणे सर्वजण हा लेख वाचून प्रतिसाद देतील हा विश्वास वाटतो.माता रमाई समजून घेतांना त्यांची झालेली प्रचंड उपासमार, स्वाभिमान जागृत ठेवून इतरांची मेहेरबानी नाकारणे. एक किंवा दोनच लुगड्यावर दिवस काढलेत,त्यातही ते दोन जोड असलेलं असायचे. आज आमच्या कपाटात जागा नाही इतक्या साड्या आणि ड्रेस झालेले आहेत. रमाई भुकेने व्याकुळ झाल्यावर भाकरी नवहती म्हणून भिजवलेली उडीदाची डाळ खाऊन आणि त्यावरच पाणी पिवून दिवस काढलेत. सरपण,गोवऱ्या थापणे,मोल मजुरी करून संसाराचा गाडा पुढे रेटला. पण कुणाही पुढे हात पसरला नाही. रमाईला 37 वर्षाच्या आयुष्यात प्रचंड संघर्ष जो जगाच्या इतिहासात आणि वर्तमानात कुणीही अनुभवला नाही तो रमाईंनी अनुभवला होता.
रमाई चा जन्म हा 7 फेब्रुवारी 1897 ला वनंदगाव,ता.दापोली जि. रत्नागिरी येथे भिकू धुत्रे आणि रुक्मिणी च्या पोटी झाला. रमापेक्षा मोठी बहीण दापोलीला दिली होती. रमा नंतर गौरी आणि सर्वात लहान शंकर होता. भिकू धुत्रे मेहनतीचे काम करून संसार चालवीत. रुक्मिणी देखील मोलमजुरी करून घराला हातभार लावीत असे.मजुरीकाम जर मिळाले नाही की गोवऱ्या थापायच्या आणि विकायच्या. वनंदगावात मजुरी मिळत नव्हती म्हणून हे कुटुंब दापोलीला मजुरीसाठी आले. तेथेच त्यांचे धुत्रे हे आडनाव वलंगकर झाले.
रमा बालपणातच आपल्या दोन भावंडांना सांभाळून घरात आईला मदत करायची. सोबतच शेण जमा करणे,शेणाच्या गोवऱ्या थापणं यात मदत करायची.आई रुक्मिणी रमाला जीवनाचं शिक्षण देत असे,— “कामाशिवाय माणसे मरतात,काम केल्याने कुणीही मरत नसतं,आपलं काम मन लावून करावं.दुनियेत गुणांची कदर होते.असाच भिकू आणि रुक्मिणीचा संसार गाडा चालू असताना भिकूला छातीत आजार जडला. त्यास रक्ताच्या उलट्या झाल्या. कारण भिकू समुद्रापासून ते थेट मार्केटपर्यंत माशांची मोठी टोपली आपल्या डोक्यावर वाहून नेण्याचे काम करीत असे.भिकूने दुखणं अंगावर काढलं.रुक्मिणीला चिंता वाटू लागली. तिनं हाय खाल्ली.अंथरुण धरलं.एके दिवशी यातच रुक्मिणीची प्राणज्योत मालवली.भिकू वलंगकर एकाकी पडले.तीन मुलं यांची काळजी वाटू लागली. पुढे काही दिवसातच त्यांनीही अंथरूण धरले आणि त्यातच त्यांची ही प्राणज्योत मालवली. बालपणातच ही तिन्ही बालके आई-वडिलांविना पोरकी झाली. वलंगकरकाका आणि गोविंदपूरकर मामा यांनी रमा,गौरा आणि शंकर यांना मुंबईला घेऊन आले.मुबंईत भायखळ्याच्या चाळीत हे सर्व राहू लागले.
रमा नऊ वर्षाची झाली होती. त्यावेळच्या पद्धतीनुसार लग्नाचे वय होते. सुभेदार रामजी यांच्या भीमराव सोबत 4 एप्रिल 1906 ला रमाच लग्न झालं.भीमराव त्यावेळी नववीत शिकत होते.त्यांचं वय 15 वर्ष होतं.हे लग्न एकदम साध्या पध्दतीने झाले.भायखळ्याच्या मासळी मार्केटात हे लग्न झालं. रमाच्या नवीन घरात सुभेदार, थोरले दीर आनंदराव,आनंदरावांची पत्नी लक्ष्मी,भीमरावांची सावत्र आई जिजाबाई, सुभेदारांची बहीण मीरा आत्या रहात असे.रमा सासरच्या सगळ्यांची आवडती बनली होती.वर्षभराने भीमराव मॅट्रिकच्या परीक्षेत पास झाले याचे,त्यांचा सत्कार याचे रमाला कौतुक वाटले. केळुसकर गुरूजीने सत्कारात भीमराव यांना गौतमबुद्धांचं स्वलिखित चरित्र भेट दिले. घरात आनंदी वातावरण झाले. भीमरावांनी रमाला शिक्षणाचे महत्व पटवून देत शिकवलं,जसं सावित्रीबाईंना ज्योतिराव फुलेंनी शिकवलं तसं रमा आता लिहायला,वाचायला शिकली.रमाईंनी बुद्धचरित्र याचे वाचन करीत असे त्याचे श्रवण सुभेदार रामजी लक्षपूर्वक करत. साहेब रमाला आणि रमाने साहेबांना पत्र वाचून उत्तरे पाठविली आहेत.रमा आणि साहेब यांचं एकमेकांवर अतूट प्रेम होते, हे पत्रावरून सहज लक्षात येते.
या आनंदातच दिवस जात होते.12 डिसेंबर 1912 ला रमाई -भिमराव यांना पहिला पुत्र झाला. ज्याचे नाव महात्मा फुले यांचा दत्तकपुत्र यशवंतचा वारसा म्हणून यशवंत ठेवले. घरातील हा आनंद अडीच महिन्याने अचानक कमी झाला.2 फेब्रुवारी 1913 सुभेदार रामजी यांचे निधन झाले. रमाला खूप दुःख झालं. भीमरावांनी ही हंबरडा फोडला.दिवसामागून दिवस जात होते आर्थिक अडचण जाणवत होती.संसारगाडा चालविणे जिकरीचे झाले होते. 1913 ते 1917 हा फार कठीण काळ होता, ज्यातून रमाई मार्ग काढत होत्या.उच्च शिक्षणासाठी भीमराव अमेरिकेला गेले होते.त्याचवेळी झालेला दुसरा मुलगा रमेश हा मरण पावला.रमाईला प्रचंड दुःख झाले.यातून सावरून रमाने पत्र पाठवून साहेबांना ही बाब कळवली. बाबासाहेब ऑगस्ट 1917 ला भारतात परत आले.रामाला फार बरं वाटलं. अशातच भीमरावांची सावत्रआई जिजाबाई यांचे निधन झाले.अशातच काही दिवसांनी भीमराव-रमाईला एक मुलगी होते,जीचे नाव इंदू ठेवलं जातं.ती फारच नाजूक होती.रमाईला गरोदरपणात अतिश्रम, झालेली उपासमार याचा परिणाम होतो.तसेच बाळंतपण नंतरही होणारे हाल यामुळे दीड वर्षातच इंदूचे निधन होते. यामुळे रमाई फार दुःखी होतात. अशातच काही दिवसांनी मोठे दीर आनंदराव यांचा मृत्यू होतो.रमाईला पुन्हा एक मोठा हादरा बसतो.एकापाठोपाठ या दुःखद घटना घडतात.जुलै 1920 ला भीमराव लंडनला जातात.त्या दरम्यान रमाईला मुलगा होतो,ज्याचे नाव गंगाधर ठेवले जाते.तो आजारी पडतो.त्याच्या दवाखान्यासाठी, औषधीसाठी रमाईकडे पैसे नसतात,अनं बाबासाहेब ही आर्थिक अडचणीमुळे तिकडून पुरेसे पैसे पाठवू शकत नसतात. काही स्थानिक कार्यकर्ते आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करतात,ती मदत रमाई घेत नाहीत.त्यामुळे त्याचे निधन होते.ही बातमी पत्र पाठवून रमाई साहेबांना कळवितात. त्यावेळी भीमराव प्रचंड हळहळतात.त्यांना आपल्या गैरहजेरीचे खूप दुःख वाटते.
एप्रिल 1923 ला भीमराव लंडनहून बॅरिस्टर होऊन भारतात परत आले.तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्ते यांची वर्दळ होती. रमाईला ही जावे वाटत होतं, पण स्वागताला आपण नीट दिसावं,कारण बॅरिस्टर यांची बायको म्हणून आपली ओळख.नेसण्यासाठी एकच साडी होती,ती दोन जोड असलेली,फाटकी होती.पर्याय म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबाना सत्कारात दिलेला ‘जरीचाफेटा’,रमाईंनी ‘साडी’ सारखा नेसून स्वागताला रमाई जातात. ही गोष्ट साहेबांच्या लक्षात येते.कालांतराने आर्थिक परिस्थिती बरी होते.अशातच रमाईला पाचवे अपत्य झाले,ज्याचे नाव राजरत्न होते.तो भीमरावांचा खूपच लाडका होता.त्याला डबल न्यूमोनिया झाला होता.या आजारपणात 29 जुलै 1926 ला त्याचाही मृत्यू होतो. रमाई -भीमराव यामुळे खूपच खचतात.त्यांना सतत राजरत्न ची आठवण येत असे…….
आमचा आजचा आणि भविष्यातील तुमचा माझा संसार सुखी व्हावा,आमची मुले उच्चशिक्षित व्हावीत त्यांनी आरोग्य व औषधी उपचार वेळेत मिळावीत ती जिवंत रहावी यासाठी भीमराव-रमाईची रमेश,इंदू, गंगाधर आणि राजरत्न ही चार मुले योग्य औषधपचार न मिळाल्याने, पोटाला अन्न न मिळाल्याने मृत्युमुखी पडली आहेत,हे आम्ही विसरू नये! माता रमाईचा बाणेदारपणा जो कुणापुढेही हात न पसरता उपाशी राहिल्या,प्रचंड कष्ट केले पण स्वाभिमान विकला नाही!
1930 च्या सुमारास रमाईला सतत अतोनात कष्ट यामुळे टी.बी.या आजाराने घेरले होते. रमाईची आई,वडील,सासरे, सासू,दीर,चार मुले अशा 9 जणांचे मृत्यू यामुळे रमाई खूप खचल्या होत्या.तरीही त्या जिद्दीने बाबासाहेबांना साथ देत होत्याच. 1930 ला साहेब पहिल्या गोलमेज परिषदेसाठी लंडनला गेले.त्यावेळी रमाईची प्रकृती बरी नव्हती, कुटुंबातील कोणीच सोबत नाही, अशावेळीसुद्धा रमाई साहेबांना अडवीत नाहीत.
जानेवारी 1935 ला रमाईची प्रकृती जास्तच बिघडत चालली होती.बाबासाहेब अनेक नामांकित डॉक्टर कडून इलाज करून घेत होते. एप्रिल-मे मध्ये तर आजारपणात वाढच झाली. रमाईंनी अंथरूनच धरले. बाबासाहेब त्यांच्या जवळ बसून त्यांना धीर देत असत. यातच 27 मे 1935 ला राजगृहातच ‘रमाई’ नी बाबासाहेबांच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडण्यासाठी निश्चितच रमाईचा त्याग,संघर्ष आणि साथ होती. बाबासाहेबांनी अनेकदा रमाईच्या समंजसपणा बद्दल कौतुक केले आहे. हिमालयाच्या उंचीच्या बाबासाहेबांची संगिनी म्हणून निश्चितच रमाईला सुद्धा प्रचंड कष्ट,त्याग व बलिदान करावे लागले आहे! हा त्याग बलिदान व रमाईचे उपकार आपण विसरता कामा नयेत!
आपणास हे विसरून चालणार नाही! नाहीतरी जागतिक वास्तू दीक्षाभूमी नागपूर येथे असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत पत्नी म्हणून किती फोटोत
रमाई आहेत, हे डोळे उघडे ठेवून पहावं! मस्तकात असणाऱ्या मेंदूला विचारावं!
निश्चितपणे आपण ‘रमाई ‘वाचून,समजून घेवूया.
आणि वर्तनात बदल करूया..
🖊रामेश्वर तिरमुखे,जालना.
संपर्क:9420705653

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here