तेलंगणा नंतर जिल्ह्याचा दक्षिण भागात पुन्हा एक बळी – भामरागड तालुक्यात रानटी हातीच्या दहशत – भामरागड वनविभागातील कियर जंगलातील घटना

517

 

गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
गडचिरोली (प्रतिनिधी )
रानटी हत्तींच्या कळपासून भरकटलेल्या रानटी हत्तीने शेजारच्या तेलंगणा राज्यात दोन बळी घेतल्यानंतर परत त्याने महाराष्ट्राच्या दिशेने कूच करीत सिरोंचा वनविभागातील रेपनपल्ली वनपरिक्षेत्रात 18 दिवस मुक्काम ठोकला होता. दरम्यान येथून त्याने भामरागड वनविभागात प्रवेश करीत गट्टा परिक्षेत्र हद्दीअंतर्गत येत असलेल्या कियर गावालगतच्या जंगलात एका इसमाला पायाखाली चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, (दि. 25) दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. गोंगलू रामा तेलामी (53) रा. कियर ता. भामरागड असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. हत्तीच्या या रुद्र अवतारामुळे तेलंगणासह-महाराष्ट्र सीमेवर प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
रानटी हत्तीच्या कळपातून वेगळा झालेल्या रानटी हत्तीने जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे मोर्चा वळवित थेट तेलंगणा राज्यात प्रवेश केला होता. या भागातही हत्तीने प्रचंड हैदोस माजविला. विशेष म्हणजे 3 व 4 एप्रिल रोजी तेलंगणा राज्यात दोन शेतक-यांचे बळी घेतले होते. त्यानंतर रानटी हत्तीने प्राणहिता नदी ओलांडून रेपनपल्ली वनपरिक्षेत्रात प्रवेश केला होता. तब्बल 18 दिवस या परिक्षेत्रात हत्तीने मुक्काम ठोकून हैदोस घातला होता. यात मंगळवारी, (दि. 23) रात्रोच्या सुमारास हत्तीने चिरेपल्ली (कोत्तागुडम) येथील परशुराम सोयाम यांच्या घराचे नुकसान केले. त्यानंतर ताडगुडा गावातही धुमाकूळ घातला होता. त्यानंतर पुन्हा 24 एप्रिलला पेरमिली वनपरिक्षेत्रातील आरेंदा मार्गे कोरेली गावात रात्रीच्या सुमारास रानटी हत्तीने शेतात हैदोस घातला. यात शेतकरी दस्सा कोहला मडावी शेतातील घराच्या तोडफोडीस शेत पिकांची नासधूस केली. अशातच गुरुवारी, (दि. 25) रोजी सकाळच्या सुमारास भामरागड वनविभागात प्रवेश केला. या प्रवासादरम्यानही हत्तीने अनेक शेतक-यांच्या घरांसह पिकांचे नुकसान केले. तर याच वनविभागातील गट्टा परिक्षेत्र हद्दीत येत असलेल्या खंड क्रमांक 528 मध्ये या रानटी हत्तीने कियर येथील गोंगलू रामा तेलामी पायाखाली तुडवून ठार केले. घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र कार्यालय गट्टाचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांचेसह त्यांच्या चमूने घटनास्थळ गाठित पंचनामा केला. मृतदेह शिवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय भामरागड येथे पाठविण्यात आले आहे. वनविभागाच्या पथकाद्वारे हत्तीच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच दहशत निर्माण झाली आहे. तेलंगणात राज्य सीमेलगत धुमाकूळ माजविल्यानंतर हत्तीने पुन्हा जिल्ह्याच्या दक्षिण क्षेत्रात हैदोस माजविला असल्याने या परिसरातील नागरीक प्रचंड दहशतीत वावरत आहेत. वनविभागाने या घटना गांभीर्याने घेत तत्काळ रानटी हत्तीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सदर घटनेपूर्वी सकाळच्या सुमारास कियर गावातील काही महिला जंगलात गेल्या असता हत्तीने त्यांचा पाठलाग करीत त्यांना पिटाळून लावल्याची माहिती आहे. भयभीत झालेल्या महिलांनी थेट गावाकडे धाव घेत याची माहिती ग्रामस्थांना दिली. यानंतर वनविभागाच्या पथक उशिरापर्यंत कियर गावात दाखल झाले होते. वनविभागाच्या पथकाद्वारे हत्तीवर नजर ठेवली जात असून अद्यापही रानटी हत्तीचा संचार कियर गावालगतच्या जंगलात असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. यामुळे कियर गावातील ग्रामस्थांसह परिसरात नागरीक दहशतीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here