



जादुटोण्याच्या संशयावर जमनी व देऊचा गेला बळी
बार्सेवाडातील जीवंत जाळण्याचे प्रकरण
गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क:
गडचिरोली(प्रतिनिधी )
राज्यात 1 मे रोजी सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासीबहूल एटापल्ली तालुक्यातील बरसेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावक-यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जादुटोण्याच्या संशयातून जमनी देवाजी तेलामी (52), देऊ कटिया आतलामी (60) या दोघांचा काही ग्रामस्थांनी बळी घेतल्याने जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, एटापल्ली तालुक्यातील बरसेवाडा येथील जमनी आणि देऊ हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावक-यांना होता. 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास गावक-यांनी पंचायत बोलावून आरोही बंडु तेलामी (3.5) वर्ष रा. बरसेवाडा हिचा मृत्यु जादुटोना केल्यामुळे झाला असा आरोप करीत येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली. त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री 10 वाजतादरम्यान गावाबाहेरील नाल्यात पेट्रोल टाकून जिवंत जाळले. दुस-या दिवशी उशीरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती. मृतक जमनी तेलामी हिचा भाऊ सादु मासा मुहोंदा यांनी यासंदर्भात गुरुवारी, (दि. 2) एटापल्ली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. प्राप्त तक्रारीअंती काही ग्रामस्थांवर गुन्हा नोंद करण्यात आला.
या घटनेची समाजातील सर्व स्तरातुन खेद व्यक्त करुन मारेकयांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरु लागली होती. घटनेची गांभीर्य व तीव्रता लक्षात घेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व एटापल्ली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलकंठ कुकडे यांना तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याचा उलगडा केला. घटनास्थळी दोघांच्या मृतादेहांचा कोळसा झाला होता. सखोल चौकशीअंती पंधरा आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली चैतन्य कदम सा यांच्या नेतृत्वात एटापल्ली पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक निलकंठ कुकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोउपनि नागरगोजे, पोउपनि म्हेत्रे, मपोउपनि गिरवलकर, व इतर अंमलदारांनी पार पाडली.
आरोपींमध्ये मुतक जमनीचा नवरा व मुलाचाही समावेश –
सखोल तपासाअंती सद्यस्थितीत गावातील एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलकंठ कुकडे करीत असून यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आरोपींमध्ये मृत जमनी हीचा नवरा देवाजी तेलामी व मुलगा दिवाकर तेलामी यांचा समावेश असल्याचे बोलल्या जात आहे.
या आरोपींचा समावेश –
जादुटोणाच्या संशयावरुन दोघांना महिलेसह दोघांना जीवंत जाळल्याप्रकरणी एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये अजय बापु तेलामी, भाऊजी शत्रु तेलामी, अमित समा मडावी, मिरवा तेलामी, बापु कंदरु तेलामी, सोमजी कंदरु तेलामी, दिनेश कोलु तेलामी, श्रीहरी बीरजा तेलामी, मधुकर देवु पोई, अमित ऊर्फ नागेश रामजी तेलामी, गणेश बाजु हेडो, मधुकर शत्रु तेलामी, देवाजी मुहोंदा तेलामी, दिवाकर देवाजी तेलामी, बिरजा तेलामी सर्व रा. बारसेवाडा ता. एटापल्ली यांचा समावेश आहे.
आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी –
सदर आरोपींविरोधात अप. क्र. 24/2024 मधील कलम 302, 307, 201, 143, 147, 149, भादवी, सहकलम 3 (2) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अन्वये दाखल गुन्हयात अटक करण्यात आली. सर्व आरोपींना अहेरी प्रथम वर्ग न्यायालयात हजर केले असता आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.