



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
सिरोंचा (प्रतिनिधी )गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिणेकडील शेवटचा तालुका असलेल्या सिरोंचा तालुक्यात उष्णतेची लाट बघावयास मिळत आहे. तापमानाचा पारा ४४ अंशाच्या पलीकडे गेला असल्याने नागरिकांच्या शरिराची लाहीलाही होत आहे. परिणामी नागरीक घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने रस्ते ओस पडलेली निदर्शनास येत आहेत.
मे महिण्यास प्रारंभ होताच सिरोंचा तालुक्यात सुर्यनारायण आग ओकु लागला आहे. तालुक्यातील तापमानातात दिवसेंदिवस वाढ दिसून येत आहे. सकाळपासूनच सूर्याच्या तिव्र झळा बसत असल्याने नागरीकांना घराबाहेर पडणे मुश्किल होऊन बसले आहे. परिणामी दुपारी 12 वाजेनंतर सिरोंचा तालुक्यातील रस्ते निर्मनुष्य दिसुन येत आहेत. यामुळे जणू तालुका मुख्यालयी संचारबंदी लागु असल्याचे दृष्य निदर्शनास येत आहे. हवामान विभागाने पुन्हा काही दिवस तालुक्यात उष्णता कायम राहणार असल्याचे संकेत दिले असल्याने सिरोंचा तालुकावासीयांना या वाढत्या तापमानाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. यामुळे उष्माघाताचा धोका बळावला असल्याने नागरिकही चिंतेत पडले आहे. उष्णतेच्या काहिलीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.