



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क :
गडचिरोली (प्रतिनिधी )
जिल्ह्यातील तापमान सातत्याने वाढत असून यामुळे उष्माघाताची शक्यता बळावली आहे. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे उष्माघाताने एका इसमाचा बळी घेतल्याची घटना सोमवारी, (दि. 6) सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. गोपिनाथ निमकर रा. कोरेगाव असे मृतक इसमाचे नाव आहे. यापूर्वी देसाईगंज तालुक्यात दोन व्यक्तींचा उष्माघातामुळे जीव गेल्याने जिल्ह्यात उष्माघाताने बळी गेलेल्यांची संख्या तीन झाली आहे. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ निर्माण झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथील मृतक गोपिनाथ निमकर हे नेहमीप्रमाणे शेतावर गेले होते. अचानक दुपारच्या सुमारास त्यांची तब्येत बिघडल्याने घरी आले. घरी येताच त्यांना चक्कर आल्याने ते बेशुद्ध पडले. त्यांना तत्काळ उपचारार्थ ब्रम्हपूरी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुन्हा येथीलच शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उष्माघात झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलल्या जात आहे. यापूर्वी मागील आठवड्यात देसाईगंज तालुक्यातील कोरगाव येथील वालदे नामक इसमासह चोप येथील मडावी यांचा उष्माघात झाल्यानेच मृत्यू ओढावला होता. तर आज सोमवारी गोपिनाथ निमकर यांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याने जिल्ह्यात उष्माघाताचा ते तिसरा बळी ठरली आहे.
मे महिन्याला सुरुवात होताच जिल्ह्याचे तापमान सातत्याने वाढत आहे. उष्णतेमुळे नागरिकांची लाहीलाही होत असतांनाच एकट्या देसाईगंज तालुक्यातच उष्माघातामुळे तीन नागरीकांचे बळी गेल्याने जिल्ह्यात खळबळ निर्माण झाली आहे.