



गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
सिरोंचा (प्रतिनिधी )
सिरोंचा-धर्मपुरी तसेच सिरोंचा-महादेवपुर या महामार्गाच्या चौपदरीकरण बांधकामाला सुरुवात झाली आहे. तसेच सिरोंचा-धर्मपूरी मार्गावरील पुलाचे कामही हाती घेण्यात आले आहे. मात्र नवनिर्मित दोन्ही कामे कासवगतीने सुरु असल्याने मागील गेल्या पंधरा दिवसापासून सदर मार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. याचा फटका वाहनधारकांसह सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे.
राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत येत असलेल्या सिरोंचा-धर्मपुरी तसेच सिरोंचा-महादेवपूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच या मार्गाअंतर्गत येत असलेल्या नाल्यावर नवीन पुल बांधकाम करण्यात येत आहे. मात्र संबंधित कंत्राटदारामार्फत कासवगतीने काम केले जात असल्याने परिसरातील नागरिकांकडून ओरड होत आहे. 6 जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसात येथील पुलाच्या कडा वाहून गेल्याने सदर ठिकाणी मोठा खड्डा पडून मार्ग बंद झाला होता. परिणामी तेलंगणावरुन येणारी बससेवा बंद पडली. वाहतूक ठप्प पडल्याने दोन ते तीन दिवस प्रवाशांना 3 किमीची पायपीट करावी लागली होती. अद्यापही या मार्गावरील बससेवा बंदच आहे.
राष्ट्रीय महामार्गावर पुलाचे बांधकाम करीत असतांना जुने पुल उध्वस्त करून नवीन पुलाचा बांधकाम सुरू करण्याआधी पर्यायी रस्ता तयार करणे गरजेचे असते. मात्र संबंधित कंत्राटदाराने पर्यायी रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने याचा फटका या मार्गावरुन मार्गक्रमण करणा-या नागरिकांना बसत आहे. कामाच्या संथगतीमुळे दररोज या मार्गावर अपघाताचे सत्र सुरु आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आली, या परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यास या मार्गावरील वाहतूक अनेक महिने बंद पडण्याचा धोका बळावला आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन कामाला गती द्यावी, अशी मागणी वाहतूकदारांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे.