


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क
गडचिरोली(जिल्हा प्रतिनिधी )
नक्षली चळवळतीतील कंपनी क्र. 10 मध्ये सेक्शन कमांडर म्हणून कार्यरत असलेल्या तसेच अनेक हिंसात्मक कारवायात सहभाग असलेल्या दोन महिला नक्षलींनी गुरुवारी, (दि. 27) जिल्हा पोलिस दलांसमोर आत्मसमर्पण केले आहे. त्यांचेवर शासनाने 16 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे (28), रा. झारेवाडा, ता. एटापल्ली व शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके (29) रा. कटेझरी अशी आत्मसमर्पित महिला नक्षलींची नावे आहेत. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी याच दलमचा दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य गिरीधर व डिव्हीसीएम संगिता या दोन वरिष्ठ नक्षली नेत्यांनी आत्मसममर्पण केले होते. त्यांचेनंतर सेक्शन कमांडरपदी कार्यरत दोन महिला नक्षलींच्या आत्समर्पणामुळे नक्षल चळवळीला खिंडार पडली आहे.
झरीना नरोटेचा 10 चकमकीसह 21 गुन्ह्यात सहभाग
बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे ही 2010 मध्ये गट्टा दलममध्ये भरती झाली होती. त्यानंतर अहेरी दलममध्ये तिची बदली झाली. 2016 मध्ये अहेरी दलममधून कंपनी क्र. 10 मध्ये बदली झाली. तर सन 2021 मध्ये ती प्लाटून पार्टी कमिटी सदस्य एरिया कमिटी सदस्यपदी आजपर्यंत कार्यरत होती. तिच्या आतापर्यंत एकूण 21 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 10 चकमक, 1 जाळपोळ, 1 अपहरणासह इतर 9 गुन्ह्याचा सहभाग होता.
शशीकलावर 8 गुन्हे दाखल
शशीकला ऊर्फ चंद्रकला ऊर्फ सुनंदा ऊर्फ मनिषा ऊईके ही 2011 मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली होती. 2013 मध्ये तिची कंपनी क्र. 4 मध्ये बदली करण्यात आली. तर 2021 मध्ये तिला बढती देत कंपनी क्र. 10 मध्ये दाखल झाली. 2023 मध्ये प्लाटुन पार्टी कमिटी सदस्य पदी बढतीवर आजपर्यंत कार्यरत होती. तिच्यावर एकुण 8 गुन्हे दाखल असून यात 6 चकमकीसह इतर 2 गुन्ह्यात सहभाग आहे.
शासनाकडून मिळणार प्रत्येकी 5 लाखाचे बक्षिस
राज्य शासनाने बाली ऊर्फ रामबत्ती ऊर्फ झरीना नरोटे व शशीकला उईके हिचेवर प्रत्येकी 8 लाखाचे बक्षीस जाहिर केले होते. त्यांच्या आत्मसमर्पणामुळे पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन दोघींनाही प्रत्येक 5 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे.
2022 पासून आतापर्यंत 19 नक्षल्यांचे आत्समर्पण
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2024 सालामध्ये आतापर्यंत एकुण 19 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.
विकासकामांना आडकाठी निर्माण करणा-याया माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल. नक्षल्यांनी हिंसेचा त्याग करावा.
नीलोत्पल, पोलीस अधीक्षक