


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा (प्रतिनिधी )तालुक्यातील जाफ्राबाद
ग्रामपंचायतीच्या कराची मागणी बिल दिल्यानंतर विहीत कालावधीत कराचा भरना न केलेल्या सिरोंचा तालुक्यातील जाफ्राबाद येथील सरपंच व ग्रामपंचायतीच्या सदस्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी ७ मार्च रोजी आदेश काढले आहेत. या संदर्भात टेकडाताला येथील साईकुमार पुलय्या मंदा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
अपात्र ठरविण्यात आलेल्यामध्ये जाफ्राबाद
ग्रामपंचायतीच्या सरपंचा निर्मला बिचमय्या कुळमेथे, ग्रामपंचायत सदस्य बिचमय्या येर्रय्या कुळमेथे, रोषक्का नारायण जाडी, यशोदा किसमतराव मडावी, क्रिष्णवेणी शंकर आत्राम यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात अर्जदाराचा अर्ज मान्य करण्यात येत आहे. गैरअर्जदार सरपंच, सदस्य यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९चा मुंबई अधिनियम क्र. ३) चे कलम १४ (१) (ह) चा भंग केल्याचे सिध्द होत असल्याने त्यांना ग्रामपंचायत जाफ्राबाद चे सदस्य म्हणुन चालु राहण्यास अनर्ह ठरविण्यात येत आहे तसेच ग्रामपंचायत जाफ्राबाद मधील पद रिक्त झाल्याचे घोषित करण्यात येत आहे.
या आदेशाचे विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र. ३) चे कलम १६ (२) नुसार आयुक्त यांचेकडे निर्णयाच्या तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत अपिल दाखल करता येईल असेही जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात नमुद केले आहे.