


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क-
सिरोंचा(प्रतिनिधी) तालुक्यातील शासकीय अनुदानित जाती नवबौद्ध निवासी शाळेतील विद्यार्थीनींना गणेशाकरिता डिबीटीद्वारे प्रत्येक विद्यार्थीनींच्या खात्यात जमा झालेली रक्कम वसूल करणा-या शाळेतील मुख्याध्यापकावर कारवाई करीत विद्यार्थीनींच्या खात्यात रक्कम वळती करावी, या मागणीला घेऊन राकॉंच्या (शरद पवार गट) वतीने सोमवारी, (दि.21) तहसिल कार्यालयासमोर बेमूद साखळी उपोषण पुकारण्यात आले.
सिरोंचा तालुक्यातील शासकीय अनु. जाती नवबौध्द निवासी शाळेतील विद्यार्थीनीना गणवेशाकरीता शासनाकडून डिबीटीद्वारे प्रत्येक विद्यार्थीनीला 3082 रुपये प्रमाणे रक्कम खात्यात जमा करण्यात आली. मात्र सदर शाळेतील मुख्याध्यापक (बोरवार) यांनी विद्यार्थीनींकडून खात्यातील पैसे वसुल करण्यात आले. सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतीगृह व निवासी शाळेतील विद्यार्थींनीना वस्तुस्वरूप वस्तु न देता थेट डिबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात आधार सलग्न पैसे जमा करण्याचे आदेश आहे. मात्र या शासन निर्णयाची पायमल्ली करीत विद्यार्थीनींच्या खात्यातील रक्कम परत मागवून त्यांची आर्थिक शोषण करण्यात आले. याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करीत विद्यार्थीनींची रक्कम परत करावी, या मागणीला घेऊन राकॉंच्या नेतृत्वात तहसिल प्रशासनाला निवेदन देत आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र पंधरा दिवसाचा कालावधी लोटूनही कारवाई न झाल्याने राकॉंचे (शरद पवार गट)जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष सागर मूलकला, चोक्कामवार यांच्या नेतृत्वात आज सोमवारी तहसिल कार्यालयासमोर बेमूदत साखळी उपोषण पुकारण्यात आले.
यावेळी राकॉं नेत्या तथा माजी जि. प. अध्यक्षा भाग्यश्री आत्राम यांनीही आंदोलनात सहभागी होत तहसिलदारांना उपोषणस्थळी बोलावून चर्चा केली. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली. याप्रसंगी बहूसंख्य राकॉं कार्यकर्ते उपस्थित होते.