


सिरोंचा- गोदावरी न्यूज नेटवर्क
जिल्ह्याचा शेवटचा टोक असलेल्या सिरोंचा शहर विकासाकरिता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ लागला आहे. शहर विकासाकरिता 25 कोटी रुपयाच्या निधीचे नियोजन करण्यात आले असून याअंतर्गत नपं क्षेत्रातील सर्वच वार्डात विकास कामांना गती देण्यात येणार आहे. विकास कामात कुचराई करणा-या संबंधित अधिकारी व कर्मचा-यांवरही सक्त कारवाई करण्याचे संकेत सिरोंचा नगर पंचायतीचे उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी दिले आहे.
शहर विकासाचा अजेंडा मांडतांना नपं उपाध्यक्ष बबलू पाशा यांनी सांगितले की, शहर विकासासाठी 25 कोटी रुपये निधीचा प्रस्ताव तयार करुन नगर विकास मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. या निधीस मंजूरी प्राप्त होताच विविध प्रलंबित कामांसह शहर विकासाला गती देण्यात येणार आहे. सद्यस्थितीत प्राणहिता नदी तिरावरील वार्ड क्र. 6 मध्ये स्मशानभूमी कामाला प्रारंभ करण्यात आला असून याकरिता 70 लाख रुपयाचा निधी मंजूर आहे. शहरातील विविध दोन ठिकाणी बगीचा निर्मितीच्या कामास प्रारंभ करण्यात आले असून आसरअल्ली तसेच गडचिरोली मार्गावरील बगिचाच्या सौंदर्यीकरणाचे काम प्रस्तावित आहे. या दोन्ही कामांकरिता 70 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत शहरातील विविध वार्डात विकास कामांकरिता 5 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीअंतर्गत वार्डात सिमेंड रस्ता निर्मितीसह वार्डातील मुलभूत समस्या सोडविण्यात येणार आहे. शहर विकासाकरिता नगराध्यक्ष फरजाना शेख यांचेसह आपण स्वत: कटिबद्ध असल्याचे पाशा यांनी म्हटले आहे.