


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क -गडचिरोली(प्रतिनिधी) अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता पार पडलेल्या निवडणूकीचा निकाल मंगळवारी (4 जून) रोजी उशिरा रात्री 7 वाजता जाहीर करण्यात आला. 26 फे-यात पार पडलेल्या मतमोजणीत धक्कादायक निकाल समोर आले. या लोकसभा मतदारसंघातून सलग दोनदा खासदार राहिलेले भाजपचे अशोक नेते यांना या निवडणुकीत दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल 1 लाख 41 हजार 234 मतांनी खा. नेते यांचा पराभव करीत तब्बल दहा वर्षानंतर कॉंग्रेसने पूर्वीच्या आपल्या बालेकिल्ल्यावर पुन्हा एकदा कब्जा केला.
नवनिर्वाचित खासदार श्री नामदेव किरसान
कृषी महाविद्यालयाच्या स्ट्रॉंग रुममध्ये अत्यंत कडेकोट बंदोबस्तात सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच कॉंग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवली. अंतिम निकालाअंती काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान यांना 6 लाख 17 हजार 792 मते मिळाली. तर प्रतिस्पर्धी विद्यमान खासदार भाजपचे अशोक नेते यांना 4 लाख 76 हजार 096 मते मिळाली. मतमोजणीची प्रारंभापासूनच काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. तर दुसरीकडे मात्र भाजपाच्या गोटात निराशा पसरली होती. गडचिरोली येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात दिवसभर शांतता होती.
19 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात झाले होते. येथे 71.88 टक्के मतदान झाले. एकूण 16 लाख 17 हजार 207 मतदारांपैकी 11 लाख 66 हजार 497 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गडचिरोली-चिमूर महाविकास आघाडीचा (कॉंग्रेस) विजय व्हावा यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुरुवातीपासूनच गडचिरोलीला आपला छावणी बनवून ठेवली होती, हे सर्वश्रुत आहे. भाजपच्या वतीने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी खा. नेते विजय निश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वडेट्टीवार आणि आत्राम यांच्यातही जोरदार लढत पाहायला मिळाली. आरोप-प्रत्यारोपांची ही मालिका अनेक दिवस सुरू होती. अखेर, दीड महिन्याच्या मतदानानंतर मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात 10 वर्षे खासदार म्हणून कार्यरत असलेले भाजपचे अशोक नेते यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी दहा वर्षांनंतर पुन्हा एकदा काँग्रेसने आपला पूवश्रीचा बालेकिल्ला शाबूत केला आहे.
विधानसभा निहाय उमेदवारांना मिळालेली मते –
विधानसभा – 1) अशोक नेते 2)डॉ. नामदेव किरसान
(1) (2)
आमगाव 81695 92564
आरमोरी 72719 106140
गडचिरोली 90008 112925
आरमोरी 67177 79329
ब्रम्हपुरी 84522 108036
चिमूर 78255 115616
पोस्टल 1720 3182
एकूण 476096 617792