


गोदावरी टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहेरी (विशेष प्रतिनिधी )
दप्तर दिरंगाईसह बेकायदा भूखंडात सहभागी असलेल्या दोषींवर अहेरीच्या भूमी अभिलेख कार्यालयाने कारवाई करावी, या मागणीसाठी माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार 2 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. या संदर्भात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खासदार डॉ. नामदेव किरसान यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
अहेरी येथील भूमी अभिलेख कार्यालयात शासकीय भूखंडाचे मालकी हक्क दाखवण्यासाठी कागदपत्रांमध्ये छेडछाड करणे, मृत व्यक्तीला जिवंत व जिवंत व्यक्तीला मृत दाखविण्याचे प्रकार सुरू होते. 22 महिन्यांपूर्वी नगरसेवक प्रशांत गोडशेलवार यांनी याबाबत संबंधितांची तक्रार करून या प्रकरणाची व इतर बेकायदेशीर कामांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र 22 महिने उलटूनही अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. दोषींवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अप्रत्यक्षपणे संरक्षण दिले जात आहे, असा आरोप करत माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी या अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांसह चौकशी समितीमध्ये दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासाठी 2 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. यासंदर्भात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार डॉ. नामदेव किरसान यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.